केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार झाल्यानंतर ४३ मंत्र्यांचा नव्याने समावेश करण्यात आला. मात्र, यामध्ये एका नवीन खात्याचा देखील समावेश करण्यात आला. देशातील सहकार चळवळीला अधिक गती देण्याच्या उद्देशाने केंद्रात सहकार विभाग हे नवीन खातं तयार करण्यात आलं असून त्याचा कार्यभार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या सहकार साम्राज्याला नियंत्रणात आणलं जाईल, असं देखील बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्या सहकार मंत्रिपदाचं स्वागत केलं आहे. मात्र, त्यासोबतच त्यांनी अमित शाह यांच्याकडून विशिष्ट अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

“अमित शाह यांच्या बँकेची बरीच चर्चा”

अमित शाह यांच्या मंत्रिपदासाठी जयंत पाटील यांनी शुभेच्छा देताना अप्रत्यक्षपणे खोचक टोला देखील लगावला आहे. “गुजरात आणि महाराष्ट्रातच सहकार आहे. गुजरातमध्ये अमित शाह एक बँकही चालवत होते. नोटबंदीच्या काळात त्यांच्या एका बँकेचं नाव फार चर्चेत आलं होतं. जास्त नोटा त्या बँकेत एक्सचेंज झाल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे सहकाराचा त्यांना अनुभव आहे”, असं ते म्हणाले.

सहकारी बँकांची स्वायत्तता धोक्यात

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अमित शाह यांना आवाहन केलं आहे. “गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकार यात फारसा फरक नाही. अमित शाह यांच्या नेमणुकीमुळे देशात सहकार चळवळ वाढायला मदत होईल. मी त्यांच्या नेमणुकीचं स्वागतच करतो. पण, त्याचसोबत रिझर्व्ह बँक नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधनं घालतेय, त्यांची स्वायत्तता धोक्यात आलीये. त्यांना अमित शाह सोडवतील, असा आम्हाला विश्वास आहे. देशातल्या बँकिंग व्यवसायावर अन्याय होतोय”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंना मंत्रीपद? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!

खडसेंविरुद्ध कुभांड!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीनं भोसरी येथील जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. मात्र, हे सगळं ईडीचं कुभांड असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. “एकनाथ खडसेंची ज्या प्रकरणात चौकशी केली आहे, त्यात अद्याप काहीही तथ्य आढळलेलं नाही. कोणतेही आरोप त्यांच्यावर सिद्ध झालेले नाहीत. व्यवहार कायदेशीररीत्या झालेत. कोणत्याही चौकशी समितीला त्यात काही आढळलं नाही. पण या एजन्सी कुभांड रचून त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचा एकनाथ खडसेंवरचा राग फार जुना आहे. त्यांना त्यांच्या पक्षातही फार वाढू दिलं नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्याचं काम त्या पक्षानं केलं. आम्ही त्यांना सन्मानानं पक्षात प्रवेश दिला. आज त्यांनी चिडून जाऊन एकनाथ खडसेंना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्याचं काम केलं आहे. मुद्दाम हे सर्व केलं जात आहे. एकनाथ खडसे लवकरच या सगळ्यातून बाहेर येतील”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.