एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा आता महत्त्वाचा बनू लागला आहे. थेट उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर देखील एसटी कर्मचारी संघटनेचे आंदोलक मागे हटण्यास तयार नाहीत. एकीकडे कर्मचारी जोरकसपणे आपल्या मागण्या मांडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या मुद्द्यावरून भाजपावर तिखट शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. “आजपर्यंतची सगळी सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलनं ही त्यांच्या संघटना करायची. कोणताही राजकीय पक्ष अशा संघटनांमध्ये पुढे जाऊन या गोष्टी करत नव्हता. प्रत्येक पक्षाने या मर्यादा पाळलेल्या होत्या. पण भाजपाला येनकेनप्रकारेन सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करायचं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

भाजपाचा आंदोलनात सहभाग

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपानं सक्रीय पाठिंबा दिला आहे. भाजपाचे राज्यस्तरावरील अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतरही काही नेते आणि कार्यकर्त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंजदोलनाला पाठिंबा देत त्यात सहभाग घेतला आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील आज दुपारी आंदोलनस्थळी जाऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्य सरकारवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

“राजकीय गोष्टींना राजकीयच उत्तर!”

“आता कर्मचारी संघटना जास्त उत्सुक नाहीत म्हटल्यावर हे पुढे येऊन आंदोलन करत आहेत. एसटी महामंडळाचे कर्मचारीही आमचेच आहेत. आम्ही त्यांच्याकडे दुजाभावाने कधीही पाहिलेलं नाही. त्यांचे प्रश्न सोडवण्याची पूर्ण इच्छा सरकार म्हणून आम्हा सर्वांची आहे. सरकार म्हणून आमची पूर्ण सहानुभूती त्यांना आहे. पण भाजपाचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसणं, दंगा करणं, अर्वाच्य बोलणं या गोष्टी करत आहेत. या मुद्द्याकडे राजकीय दृष्टीने पाहायला लागलं, तर त्या राजकीय गोष्टींना राजकीयच उत्तर द्यावं लागेल. अनिल परब यांनी आंदोलक संघटनांना अनेकदा आवाहन केलं आहे. हे प्रश्न सुटावेत अशीच आमची भूमिका आहे”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

नितेश राणेंची टीका

भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज आंदोलनकर्त्यांची आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली. यावेळी, महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे एकटे नाहीत हे सांगण्यासाठी आलोयं, भाजपा एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे, असा शब्द आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना देऊन नितेश राणे आझाद मैदानामधून बाहेर पडत असतानाच प्रसारमाध्यमांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी नवाब मलिक यांनी केंद्रांने खासगीकरण केलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी भाजपाने रस्त्यावर उतरावे अशी टीका केल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना नितेश राणे चांगलेच संतपल्याचं दिसलं. नवाब मलिक यांचा एकेरी उल्लेख करत, नवाब मलिक गद्दार आहे. दहशतवाद्यांना साथ देणारे ते देशद्रोही आहेत, असं वक्तव्य केलं. तसेच पुढे बोलताना, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला आम्ही उत्तर देता कामा नये, असंही नितेश राणे पुढे म्हणाले.