scorecardresearch

मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे सांगायला लाज वाटत नाही – जितेंद्र आव्हाड

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. बीडमध्ये बुधवारी संविधान बचाव महासभा झाली. यावेळी बोलताना आव्हाड यांनी देशाची सध्याची स्थिती ही हुकूमशाहीसदृश असल्याची टीका करताना इंदिरा गांधी यांना लक्ष्य केलं. इंदिरा गांधी यांनीही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, अशा शब्दांत आव्हाड यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

स्पष्टीकरण काय ?
“बीडमध्ये केलेला भाषणाचे अर्थ अनर्थ काढले जात आहे. इंदिरा गांधींना अतिशय आदराने मानणारा मी एक राजकीय कार्यकर्ता आहे, ज्याच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष नाही तर एक लोकचळवळ आहे. इंदिरा गांधींनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकतात. देशात जेव्हा जेव्हा लोकशाहीच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणली जात आहे असं लोकांना वाटतं तेव्हा जनता पेटून उठते. आज अमित शाह आणि मोदींविरोधात तेच घडत आहे. इंदिरा गांधींइतकं कतृत्त्व कोणाचंच नाही. जर त्यांचा पराभव होऊ शकतो तर मोदी आणि अमित शाह कोण आहेत. इंदिरा गांधींचा समर्थक आहे हे सांगायला मला लाज वाटत नाही. इंदिरा गांधींची तुलना मोदी-शाह यांच्याशी होऊच शकत नाही,” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा – इंदिरा गांधींकडूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न – आव्हाड

काय बोलले होते ?
जितेंद्र आव्हाड यांनी देशातील सद्य:स्थितीला ‘हिटलरशाही’ संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. हा संदर्भ देताना आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. आव्हाड म्हणाले की, “इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देईल”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp jitendra awhad clarification congress indira gandhi sgy

ताज्या बातम्या