महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, दुसरीकडे मध्य प्रदेशचा अहवाल गृहित धरत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घेण्यास परवानगी दिली आहे. यानंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणावर भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असते तर मी त्यांच्या शेजारी ठाण मांडून करुन घेतले असते. ओबीसी आरक्षण हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्वांवर आधारित आहे. सर्वोच्च न्यायालयात हा विषय असून त्यावर राजकारण करणे ही आपली प्रगल्भता नाही हे दर्शवते. प्रगल्भता असेल तर तुम्हाला मान्य करावं लागेल की हे सर्व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात महाराष्ट्राच्या अ‍ॅडव्होकेट जनरलांच्या चुका, पण…”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “ज्या पद्धतीने बांठिया आयोग काम करतोय, डाटा गोळा करतोय त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १०० टक्के महाराष्ट्राच्या बाजूने लागेल व ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल”.

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात महाराष्ट्राच्या अ‍ॅडव्होकेट जनरलांच्या चुका – पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्या चुका असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नाना पटोले म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह व्हाव्यात अशी मागणी काँग्रेस ओबीसी सेलची व ओबीसी संघटनांची आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याबाबत निवेदन दिलं आहे. आम्ही अनेकदा सांगितलं की ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्या अनेक चुका दिसत आहेत. मी अनेकदा याबाबत सूचना केल्या आहेत.”

“एका आठवड्यात मध्य प्रदेशात काय चमत्कार झाला?”, ओबीसी आरक्षण निकालावरून नाना पटोले यांचं भाजपावर टीकास्त्र

फडणवीसांना टोला –

हनुमान चालिसा सोडून पेट्रोल – डिझेलवर बोलतायत हे नसे थोडके असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यावेळी लगावला. राज्य सरकारने पेट्रोल- डिझेलवरील मुल्यवर्धित करात कपात केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टिका केली. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

“देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. उशिरा का होईना पेट्रोल, डिझेल, गरीबांचे रोजगार याबद्दल त्यांना जाणीव होतेय,” अशा शब्दात चिमटाही जितेंद्र आव्हाड यांनी काढला.