गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून मोठा वाद सुरू झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेनंतर त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावरून राजकीय वातावरण देखील तापू लागलं असताना आता राज ठाकरेंच्या अयोध्या दोऱ्याला राजकीय संघटनांकडून विरोध केला जात आहे. भाजपा नेते बृजभूषण सिंह यांनी तर राज ठाकरेंना माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये पाऊल ठेऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला एकीकडे तीव्र विरोध होत असताना त्यांनी घेतलेल्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.

राज ठाकरेंनी सर्वात आधी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात, त्यानंतर ठाण्यात झालेल्या उत्तर सभेमध्ये आणि शेवटी १ मे रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ३ मे रोजी ईद झाल्यानंतर ४ मे पासून राज्यभर मशिदींवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी सगळ्यांना केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण तापलं असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ईदगाह मैदान परिसरातील सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी आव्हाड हे बोलत होते.

“असं करायचं नसतं”

“आज १० वाजल्यानंतर तुम्ही या रस्त्यावरून कुठेही गेलात, तर सगळीकडे शांतता असते. देवळातून टाळ-मृदुंगाचा आवाज येतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. सकाळी गेलेला शेतकरी रात्री परत येतो तेव्हा देवळात जातो. डोकं शांत करत भजन-कीर्तन करतो. तुमच्या आरत्या-भजन कीर्तन बंद झालं. तुम्ही मारायला गेला होतात कुणाला आणि मारलंत कुणाला. असं करायचं नसतं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

या सगळ्याची किळस वाटते”, महात्मा गांधींबद्दलच्या ‘त्या’ विधानावरून आव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा!

“स्वत: माणूस जेव्हा मातीत खड्डे खणतो, तेव्हा तोच खड्ड्यात पडतो. सर्वात जास्त नुकसान हिंदू समाजाचं झालं. धर्मा-धर्मात भांडणं लावून झाली. ते जमलं नाही. आता जाती-जातीत भांडणं लावतील”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

“फक्त मतांसाठी राजकारण नको”

दरम्यान, यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मुस्लीम समाजातील मुलांना मराठीचं शिक्षण देण्याची भूमिका मांडली. “मी समाजहिताचं बोलतो. मुस्लीम समाजाचं हित शाळेत जाऊन मराठी शिकण्यामध्ये आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धापरीक्षा मराठीत होतात. ही मुलं मराठी शिकलीच नाहीत, तर ती मुख्य प्रवाहातून लांब फेकली जातील. त्यांना मराठी शिकवावीच लागेल. फक्त मतांचं राजकारण करायचं नाही. त्यांच्या हिताचं काय आहे, तेही बघायचं. त्यांचं हित जपलं तर ते मतं देतीलच. पण मतांसाठी बोलायचं नाही हे मला पटत नाही. त्यामुळे मी बोलतो”, असं आव्हाड म्हणाले.