मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच, असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरून लक्ष्य ठरलेल्या राज ठाकरे यांची मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाडांचा चेहरा नागानं फणा काढावा असा असल्याचा टोला यावेळी लगावला. दरम्यान त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे काय म्हणाले ?

राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांची नक्कल करत त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टोले लगावले. “यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे. उद्या काहीतरी म्हणेलच, डसू शकतो वगैरे.. ये.. शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. म्हणे राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. बरं इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला”, अशा प्रकारे एकेरी उल्लेख करत राज ठाकरेंनी टीका केली.

मुंब्र्यातून अटक दहशतवाद्यांची दिली यादी

यावेळी राज ठाकरेंनी मुंब्र्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची यादीच सादर केली. “२४ ऑगस्ट २००१ सीमीच्या सहा हस्तकाना अटक, २० डिसेंबर २००१ अबु हमजा, १६ मार्ट २०२० हिजबुल मुजाहिदिनी चार अतिरेक्यांना अटक, २३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद, २०१६ ला ताब्यात घेतलाल आयसीसचा मोरक्या, १६ मे २००३ मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक, रिजवान मोबिन या संशयित अतिरेक्याला अटक, २६ जानेवारी २०१९ एका दहशतवाद्याला अटक”, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

“आता म्हणाल, वस्तरा कुठे सापडला?”

दरम्यान, यावरूनही राज ठाकरेंनी आव्हाडांवर निशाणा साधला. “आता तुम्ही म्हणाल, ‘वस्तरा नाही सापडला. आता कसा संन्यास घेणार? मी कुठे म्हटलो होतो की दहशतवादी सापडणार नाहीत?’ या अशा असंख्य घटना देशातल्या अनेक मदरशांमध्ये चाललेल्या आहेत. पाकिस्तानी अतिरेकी, शस्त्र सापडत आहेत. यात देशावर खरंच प्रेम करणारा मुसलमान भरडला जातोय”, असं राज ठाकरे म्हणाले.

आव्हाडांचं प्रत्युत्तर –

“त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे की माझं तोडं काहीतरी नागाच्या फण्यासारखं दिसतं. अशा वैयक्तिक कोट्या तर कोणालाही करता येतात. ते मिमिक्री आर्टिस्टचं काम आहे. पण ज्याच्यात प्रगल्भता आहे, जो समोरच्यांचा आादर करतो जे महाराष्ट्राच्या मातीची शिकवण आहे, ज्याची समाजात प्रतिष्ठा आहे त्यांना मी अरे तुरे करत नाही. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे असं जर तुम्ही म्हणाल तर मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावं का? तो भाग कोणता हे महाराष्ट्र ओळखतो,” असं प्रत्युत्तर आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं.

‘‘शरद पवार हे नेहमीच आपल्या भाषणात महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, असे म्हणतात. पण, त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मुसलमानांची मते मिळणार नाहीत, या भीतीने पवार छत्रपतींचे नाव घेत नाहीत’’, अशी टीका राज यांनी केली आहे. त्यावरही आव्हाडांनी भाष्य केलं.

“”शाहू, फुले, आंबेडकर हे छत्रपतींच्या विचारांचे वारसदार होते हे यांना कळलंच नाही, कारण यांनी बहुजन समाजाचा इतिहास वाचला नाही. हे नेहमी पुरंदरेंचा इतिहास वाचत गेले. ज्या पुरंदरेंनी जेम्स लेनला माहिती देऊन आमचया जिजाऊंची बदनामी केली ते यांचे आदर्श. इंग्लंडहून आलेला माणूस आमच्या जिजाऊंची बदानीमी करतो, चारित्र्यावर शिंतोडे उडवतो, चारित्र्यावर संशय व्यक्त करतो…पान नंबर ९३, परिच्छेद क्रमांक ४ यामध्ये काय लिहिलं आहे ते वाचा,” असा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे.

“त्यांनी पुस्तकात १२ लोकांचे आभार मानले असून त्यात एक नाव बाबासाहेब पुरंदरेंचं आहे. मग ही माहिती कोणी दिली? पुस्तक छापण्याआधी वाचण्यासाठी दिलं जातं ते बाबासाहेब पुरंदरेंना वाचता नाही आलं? आज ते मृत आहेत. त्यांचा मी सन्मान करतो, त्यांच्याबद्दल काही बोलायचं नव्हतं. मृत्यू झाल्यावर आपण विसरुन जातो, पण तुम्ही आठवण करुन देऊ नका. तुम्ही ज्यांची शिकवण घेऊन शिकलात त्यांची पुस्तकं वाचा,” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.