scorecardresearch

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन समजावून सांगणं, त्यानंतर मी कार्यरत होणं…; आव्हाडांनी करुन दिली आठवण

“क्षणभर विश्रांती हॉटेलमध्ये कोणाला थांबवण्यात आलं, सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नका”

NCP, Jitendra Awhad, Thane Mayor, Shivsena, Naresh Mhaske, Maharashtra CM Uddhav Thackeray, Sharad Pawar
"क्षणभर विश्रांती हॉटेलमध्ये कोणाला थांबवण्यात आलं, सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नका"

राज्यात सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात वाद सुरु आहे. दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. खारेगाव पट्ट्यात ठाणे महापालिकेने उभारलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात या वादाचीच ठिणगी उडाली. कळवा खारेगांव उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू झालेला वाद थांबताना दिसत नाही. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांना सुनावलं असून जुन्या जखमेवर बोट ठेवलं आहे.

दिवा येथील एमएमआरडीएच्या घर घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारपासून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री भेट देऊन आंदोलन स्थगित केले. यावेळी ते बोलत होते.

“मला मुख्यमंत्री किंवा इतर कोणाला सांगायची गरज वाटत नाही,” जितेंद्र आव्हाड रोखठोकच बोलले

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या फेसबुक पोस्टवरुन आव्हाडांनी नारायण राणेंकडे कोण जाणार होतं? अशी विचारणा केली आह. “जे एकनिष्ठेची भाषा करतात त्यांनी क्षणभर विश्रांती कुठे घेतली होती. जे एकनिष्ठेबद्दल बोलतात त्यांनी स्वतःच्या हृदयात जाऊन तपासावे, नारायण राणेंकडे कोण जाणार होते? कोणाला कोणाच्या गाडीतून उतरवण्यात आले, क्षणभर विश्रांती हॉटेलमध्ये कोणाला थांबवण्यात आले, या सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नका”, असे खडेबोल जितेंद्र आव्हाड यांनी महापौर नरेश म्हस्के यांना सुनावले.

“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करणं, उद्धव ठाकरेंना कार्यकर्ता तुटू देऊ नका समजावून सांगणं, त्यानंतर मी कार्यरत होणं, नजीबने त्यांना लपलेल्या स्थितीतील बाहेर आणणं, क्षणभर विश्रांतीमध्ये उद्धव ठाकरेंसमोर उभं करणं आणि त्यांनी त्यांना माफ करणं याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. निष्ठा वैगेरे मला शिकवू नका. एका खांबावर मी ३५ वर्ष उभा असून अजिबात डगमगलेला नाही,” असं त्यांनी सांगितलं.

“आघाडीबाबत मी निर्णय घेणार”

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी शिवसेनेला आव्हान दिलं असून स्वबळावर निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. याबद्दल विचारण्यात आलं असता आव्हाड म्हणाले की, “गटनेते अनावधानेने बोलले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बाजूने असून आघाडीच्या बाजूनेच लढेल. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये मतांतर असतं. ठाण्याचा संपर्कमंत्री जितेंद्र आव्हाड असून आघाडी तुटेल असं आमच्याकडून काही केलं जाणार नाही,” असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

ठाणे महापालिका आयुक्त दलित आणि मुस्लिमविरोधी; आव्हाडांचा गंभीर आरोप, म्हणाले, “कणा नसणारे हे पहिले…”

शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असं माझं मत आहे. राष्ट्रवादीचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे, त्यामुळे आघाडीबाबत मी निर्णय घेणार आहे. तसेच यापुढे आघाडीबाबत मीच बोलणार आहे. पक्षातील इतर कोणी बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले.

ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६८ नगरसेवक असून या पक्षाची एकहाती सत्ता आहे. विरोधी बाकांवर बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ३४ तर भाजपचे २३ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीच्या ३४ नगरसेवकांपैकी ८ नगरसेवक हे राबोडी आणि लोकमान्यनगर पट्ट्यातून निवडून आले आहे. या विजयातही नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे या दोन स्थानिक नेत्यांचा वाटा मोठा राहिला आहे. राष्ट्रवादीचे उर्वरित २६ नगरसेवक हे कळवा-मुंब्रा भागातून निवडून आले आहेत यावरून या पक्षाचा जीव नेमका कुठे आहे हे लक्षात येते. कळव्यातील १६ जागांपैकी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९, शिवसेनेचे ६ तसेच १ अपक्ष नगरसेवक निवडून आला. या १६ पैकी किमान १२ जागांवर विजय मिळेल अशी आव्हाडांना खात्री होती, मात्र शिवसेनेने हे गणित त्यावेळी चुकविले.

राज्यातील सत्ता, नगरविकाससारखे तगडे खाते आणि महापालिकेवरील पकड लक्षात घेऊन श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोघांनी यंदा कळव्यात राष्ट्रवादीला कडवे आव्हान द्यायची रणनीती आखली आहे. कळव्यातील विकासकामांवर शिवसेनेची मोहर कशी उमटेल यासाठी हे दोन नेते प्रयत्न करताना दिसतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp jitendra awhad thane mayor shivsena naresh mhaske maharashtra cm uddhav thackeray sharad pawar sgy

ताज्या बातम्या