महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमध्ये घेतलेल्या सभेमधून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. याच टीकेला आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उत्तर दिलंय. विशेष म्हणजे अजित पवार यांनी इतर नेत्यांची मिमिक्री करणाऱ्या राज ठाकरेंची मिमिक्री करत निशाणा साधल्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच हसू फुटल्याचं पहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“त्या सभेला महत्वं द्यायचं कारण नाही. पूर्वीचीच कॅसेट लावलेली आहे, पवार साहेब जातीयवादी. नाशिककरांना माहितीय की पवार साहेब जातीयवादी आहेत की नाही. राजू शेट्टींनी सांगितलेलं की पवार जातीयवादी नाहीत. रामदास आठवलेंनी सांगितलेलं ना की पवार जातीयवादी नाहीत,” असं म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरेंनी इतर नेत्यांनी खोडून काढलेला मुद्दा मांडल्याचं अधोरेखित केलं. “साहेबांची ५०-६० वर्षांची कारकीर्द तुमच्यासमोर आहेच. त्यात एखादा धादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्व द्यायचं काय कारण आहे?” असा प्रश्न अजित पवारांनी विचारलाय.

“लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती आता तिकडची सुपारी घेतली,” असं अजित पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला. “आपली म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठिंब्याने ते बोलत होते. सुपारी घेतली असं नाही. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज. असं मी बोलेलो नाही. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेतो,” असं ते म्हणताच कार्यकर्ते परत हसू लागले.

“त्या काळात त्यांनी भाषणं काय दिली? केंद्र सरकारच्या विरोधात दिली. आता मात्र भाषणं कशी चाललीयत. काल दुसऱ्या कुठल्याही नेतृत्वावर ते बोलले नाहीत. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि तेच तेच. काय तर पवार साहेब शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेतात. अरे पवार साहेबांनी कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं घेऊ नये हेच एकेकाळी पवार साहेबांची मुलाखत घेताना काय कौतुक करायचे,” अशी आठवण अजित पवारांनी करुन दिली.

“अरे बापरे बापरे, किती झटपट हे लोक सरड्यासारखे रंग बदलतात त्याचं त्यांना माहिती. आम्ही तरी एखाद्याचं कौतुक केलं आणि परत टीका करायची म्हटल्यावर विचार करतो अरे कसं बोलायचं. जीभ पण वळत नाही, रेटली जात नाही. त्यांना काही देणं घेणं नाही,” असा टोला अजित पवारांनी लगावला.

“कधी तरी १५-२० दिवसांनी एखादी सभा संध्याकाळी… दिवस मावळल्यावर. उन्हाबिन्हाचं नाही, सुर्य मावळल्यानंतर जरा वातावरण बरं असल्यानंतर,” सभा घेतात असा टोला अजित पवारांनी लगावला. त्यानंतर सहकाऱ्यांकडे नॅपकिन मागत तो राज ठाकरे भाषणादरम्यान ज्याप्रमाणे नाकावरुन फिरवतात तसा नाकारवरुन फिरवत त्यांची नक्कल केली. “काय पुसततात… काय एकदाचं आहे ते पुसून घे आणि मग बोल ना. सारखं सारखं काय नाकाला नॅपकिन लावायाचा,” असा टोला अजित पवारांनी नाकावरुन नॅपकिन फिरवताना लगावला.

“होतं काय की त्यांनी भाषण दिल्यानंतर आपण दोन तीन दिवस ती कॅसेट चावलतो. मग मीडिया त्याला अजित पवारांनी हे प्रतिउत्तर दिलं. मग परत त्यातून काय बोलणार काय नाही असं चालू राहतं. नाशिककरांनो, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो यामधून लोडशेडिंगचा प्रश्न सुटणार नाहीय,” असंही अजित पवार म्हणाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader ajit pawar do mimicry of mns chief raj thackeray scsg
First published on: 02-05-2022 at 18:07 IST