नाशिकच्या काळाराम मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांना वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करू दिले नाहीत. यासंदर्भातली एक इंस्टाग्राम पोस्ट संयोगीताराजे यांनी पोस्ट केली. या प्रकारानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी संबंधित महंतावर कारवाई करण्याची मागणी केली. महंतांना २४ तासाच्या आत अटक करा, अन्यथा बहुजन समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही मिटकरींनी दिला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मिटकरी म्हणाले, "नाशिक येथील काळाराम मंदिरात छत्रपती घराण्याच्या वारसदार संयोगीताराजे छत्रपती यांना वेदोक्त प्रकरणाचा अनुभव आला. १८९९ साली शाहू महाराजांनाही पंचगंगेच्या घाटावर कार्तिक मासाच्या वेळी अशा प्रसंगाचा अनुभव आला होता. त्यांना अपमानाचा प्रसंग सहन करावा लागला. काळाराम मंदिरातील महंतांनी संयोगीताराजे यांना रामरक्षा स्तोत्र आणि वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखलं किंवा तुम्हाला तो अधिकार नाही, असं सांगितलं." हेही वाचा- “…तेव्हा अजित पवारांचा फोटो जाळण्यासाठी आव्हाडांनी फोन केला”, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा "आताच्या काळात हे महंत आणि ब्रह्मवृंद असे उन्मत होत असतील, तर अशा महंतांवर २४ तासांच्या आत कारवाई करावी. कारण संयोगीताराजे यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. त्यामुळे बहुजन समाजाचे घटक म्हणून आम्ही तो कधीही सहन करणार नाही. तुमची जर एवढी मग्रुरी वाढली असेल आणि तुम्ही छत्रपतींच्या वारसदारांना वेदोक्त आणि पुरानोक्त शिकवत असाल, तर आजपर्यंत तुम्ही त्यांचे चाकर होते, चाकरासारखं वागावं. महंत खोटा बोलतोय, संबंधित महंतांवर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाई करावी," अशी मागणी मिटकरींनी केली. हेही वाचा- संयोगीताराजे व्हायरल पोस्ट : “सनातन धर्म पुन्हा डोकं वर काढतोय..” जितेंद्र आव्हाडांनी दिली ‘या’ आंदोलनाची हाक मिटकरी पुढे म्हणाले की, जर छत्रपतींच्या घराण्याचा अपमान होत असेल. तर तो आम्ही सहन करणार नाही. वेदोक्त आणि पुरानोक्त ब्रह्मवृदांची खासगी मालमत्ता नाही. शाहू महाराजांचा अपमान झाला. त्यावेळी सुद्धा आग ओकली गेली. पण आता आम्ही शांत बसणार नाही. महाराष्ट्रातल्या बहुजनांनी जागं व्हावं. अशा भोंदूबाबांना जाब विचारावा. ज्या महंतांनी संयोगीताराजेंचा अपमान केला असेल, त्या महंतांना २४ तासांच्या आत अटक करा, नाहीतर महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला.