छगन भुजबळांना तुरुंगात मिळते दारु, चिकन मसाला: अंजली दमानियांचा आरोप

समीर भुजबळांना मोबाईलवर बोलण्याची मुभा

छगन भुजबळ (संग्रहित छायाचित्र)

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना तुरुंगात ‘फाईव्ह स्टार ट्रीटमेंट’ मिळत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तुरुंगात भुजबळांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवावी अशी मागणीच त्यांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी तुरुंग प्रशासन विभागाच्या अतिरिक्त अधीक्षकांकडे ईमेलद्वारे तक्रार केली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ यांना तुरुंगात टीव्ही उपलब्ध करुन देण्यात आले असून यावर ते हिंदी चित्रपट बघत असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. याशिवाय त्यांना तुरुंगात जेवणात चिकन मसाला, दर दोन तासांनी फळ आणि समीर भुजबळांना व्होडकाही उपलब्ध करुन दिली जात असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. नारळाच्या पाण्यातून तुरुंगात व्होडका आणली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

समीर भुजबळ यांना दररोज तीन तास तुरुंगात मोबाईलवर बोलण्याची मुभा दिली जाते. यासाठी तुरुंगातील जॅमरही बंद केले जातात असे दमानियांनी ईमेलमध्ये म्हटले आहे. मी यासंदर्भात वेळोवेळी तक्रार केली आहे पण याची दखल घेण्यात आली नाही, तुम्ही एक जबाबदार अधिकारी असून याची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भुजबळ यांच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवावी अशी मागणीही त्यांनी केली.

भुजबळ हे सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या अनेकांना भेटतात. आजही पीएमएलए न्यायालयात भुजबळ हे तीन तासांपूर्वीच कोर्ट रुममध्ये आले होते. याकालावधीत त्यांनी कंत्राटदारांसह अनेकांची भेट घेतली असा आरोप त्यांनी केला. भुजबळ यांच्यासंदर्भातील पुरावे मी वेळोवेळी दिले आहेत, यासंदर्भातील व्हिडीओ माध्यमांनीही दाखवले आहे. पण त्यानंतरही माझ्या तक्रारींवर कारवाई झाली नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ncp leader chhagan bhujbal and sameer bhujbal get chicken masala vodka in arthur road jail says anjali damania

ताज्या बातम्या