सातारा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची परस्परांवर कुरघोडी

या पराभवाचे फार दूरगामी परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होतील हे निश्चित.

शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर त्यांच्या समर्थकांनी सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली

विरोधी गटातील आठ जण विजयी; काँग्रेसला एकही जागा नाही

विश्वास पवार, लोकसत्ता

वाई : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सर्वपक्षीय पॅनलने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व मिळवले. मात्र या निवडणुकीत स्वत:चे महत्त्व अधोरेखित करण्याच्या प्रयत्नात प्रमुख नेत्यांनी स्वहिताला प्राधान्य दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत मोठा फटका बसला. नेत्यांनी पाडापाडी केल्याने विरोधी दोन ते तीन संचालक निवडून यायचे तेथे बंडखोरांसह आठ जण विरोधात निवडून आले. शरद पवार आणि अजित पवारांनी उमेदवार निश्चित केले व निवडून आणण्याचे आदेश देऊनही पक्षाचे वजनदार नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा फक्त एका मताने झालेला पराभव म्हणजे दोन्ही पवारांचीही जिल्ह्यावर पूर्वीसारखी पकड राहिली नसल्याचे स्पष्ट झाले.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विजयाने राष्ट्रवादीची प्रतिष्ठा शिल्लक राहिली आहे. सत्ता आणि विजय मिळाला असला तरी राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. पक्षापेक्षा स्वत:चे महत्त्व वाढविण्यात नेते व्यस्त होते. हेच धोरण राष्ट्रवादीसाठी धोकादायक ठरणार आहे. शशिकांत शिंदेंचा ठरवून पराभव केल्यामुळे पक्षातील इतर प्रमुख नेत्यांची नाचक्की झाली. या पराभवाचे फार दूरगामी परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होतील हे निश्चित. राष्ट्रवादीची बँकेवर सत्ता आली. मात्र त्यांना चार जागा गमवाव्या लागल्या. बँकेत शिवसेनेचा प्रवेश झाला तर काँग्रेसचे एकही संचालक नाहीत.

या निकालानंतर शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी सातारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील व त्यांचे बंधू नितीन पाटील यांच्यासह अकरा जण बिनविरोध निवडून आले होते. दहा जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात होते. या दहा जागांमध्ये सहकार व पालक मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदार शशिकांत शिंदे हे निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते. मतमोजणीत बाळासाहेब पाटील विजयी झाले तर शंभूराज देसाई व आमदार शशिकांत शिंदे पराभूत झाले.

शशिकांत शिंदे यांचा पराभव

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर  झालेल्या दुसऱ्या निवडणुकीत  माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याकडून राष्ट्रवादीने बँकेची सत्ता खेचून घेतली होती. आजपर्यंत बँकेवर राष्ट्रवादीचे नेतृत्व आहे.  सातारा तालुक्यातील मते निर्णायक असल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी खुबीने वापर करून घेतला. राष्ट्रवादीने त्यांना फक्त दोनच जागा दिल्या. ऐनवेळी खासदार उदयनराजे भोसले यांनाही बिनविरोध निवडून आणून धक्का दिला. राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व कसे राहील असे चांगले नियोजन करण्यात आले. निवडणुकीच्या सर्व प्रक्रियेत शशिकांत शिंदेंना बरोबर ठेवून प्रमुख नेत्यांकडून त्यांना गाफील ठेवण्यात आले. 

मागील दहा वर्षांपासून शशिकांत शिंदे जावळी मतदारसंघातून संचालक होते. विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत जावळी तालुका साताराला जोडला गेला आणि त्यांनी पक्षादेश म्हणून कोरेगाव येथून निवडणूक लढविली आमदार झाले. सातारा जावळीतून शिवेंद्रसिंहराजे आमदार झाले. पहिल्यापासून आजपर्यंत अजित पवार यांनी शिवेंद्रसिंहराजेंना राजकीय ताकद दिली. आता शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये आहेत.

महिनाभर मतदार सहलीवर..आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या पत्नी अर्चना रांजणे या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. बँकेची मतदारयादी झाल्यापासून दीड पावणेदोन महिन्यापासून आपल्या सोसायटी गटातील मतदार सहलीवर नेले. विजयी होताच रांजणेंनी शिवेंद्रसिंहराजेंची जाऊन भेट घेतली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना शेवटपर्यंत  उमेदवारी मिळणार आहे किंवा नाही हेच माहीत नव्हते. कोरेगावमध्ये राष्ट्रवादीला धोबीपछाड देऊन आमदार महेश शिंदे यांनी पडद्यामागून सूत्रे हलवत सामान्य कार्यकर्त्यांला निवडून आणत आपली चुणूक दाखवली. रामराजेंना शेखर गोरे यांच्यासारखा तगडा विरोधक बँकेत यापुढे आव्हान देणार आहे. माजी आमदार प्रभाकर घार्गे कारागृहातून निवडून आले

शिवेंद्रसिंहराजे हे कोणत्या पक्षातले आहेत हे जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांनी सांगावे. ज्ञानदेव रांजणे हे छोटे कार्यकर्ते आहेत. त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे. जिल्ह्यात मी राष्ट्रवादी पक्ष वाढवत असल्यानं अनेकांना माझा अडसर आहे हे मला माहीत आहे. पक्षासाठी मी कुणालाही अंगावर घेतो हा माझा दोष आहे. जावळीची जनता कोणाच्या मागे आहे  हे कळेलच. माझ्या पराभवामागे मोठें कारस्थान आहे. मी माझा पराभव मान्य करतो. शरद पवार आणि अजित पवार हेच माझे नेते आहेत. कटकारस्थाने झाली नसती तर नक्कीच आज निकाल वेगळा दिसला असता.

शशिकांत शिंदे , आमदार

जावळीमध्ये ज्यांनी एक वेगळी परंपरा सुरू केली होती त्या परंपरेला कंटाळलेल्या मतदारांचा हा विजय आहे. दडपशाही आणि दहशतीला कंटाळलेल्या सर्वसामान्य जावळीकरांची इच्छा आणि मतदारांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवली. निवडणूक लढवत असताना  शेवटच्या टप्प्यामध्ये मला राष्ट्रवादीच्या वरिष्ट नेत्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. माझी इच्छा असूनसुद्धा मला मतदारांच्या इच्छेमुळे माघार घेता आली नाही.  

ज्ञानदेव रांजणे, जावळी सोसायटीतील विजयी उमेदवार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp leader defeat in satara central district cooperative bank elections zws

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या