scorecardresearch

“पोरीबाळींच्या मागे लागून कुणी…”, गिरीश महाजनांवर एकनाथ खडसेंची खोचक टीका; ‘नौटंकी’ म्हणून केला उल्लेख!

एकनाथ खडसे म्हणतात, “आत्तापर्यंत त्यांचं नावही कुठे येत नव्हतं. यांची नावं वेगवेगळ्या ठिकाणी जोडली जातात. अशा लोकांची मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण्याची योग्यता तरी आहे का?”

eknath khadse mocks girish mahajan
एकनाथ खडसे यांची गिरीश महाजन यांच्यावर खोचक शब्दांत टीका!

उत्तर महाराष्ट्रातील सध्याचे प्रमुख नेते म्हटलं तर दोन नावं सगळ्यात आधी समोर येतात. ती म्हणजे एकनाथ खडसे आणि दुसरे गिरीश महाजन. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नसल्याचं राजकीय चित्र गेल्या कित्येक वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रात, विशेषत: जळगावमध्ये दिसून येतं. दोन्ही नेते सातत्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दिसतात. दोनच दिवसांपूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये महागाईविरोधातील आंदोलनावरून कलगीतुरा रंगताना दिसून आला होता. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

भाजपाचा जनआक्रोश मोर्चा, खडसेंचा निशाणा

दोन दिवसांपूर्वी भाजपानं भारनियमनाविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला होता. यावरून टीका करताना “असा जनआक्रोश मोर्चा केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईविरोधात का काढला जात नाही? ही दुटप्पी भूमिका आहे”, असं खडसे म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तरादाखल “महागाईविरोधात आघाडी सरकारने आंदोलन करून पाहावे, किती लोक येतात ते त्यांना कळेल”, असा टोला गिरीश महाजन यांनी केला होता.

“गिरीश महाजनांचं आंदोलन म्हणजे नौटंकी”

दरम्यान, आमदार गिरीश महाजन यांच्या टोल्यावर एकनाथ खडसेंनी जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना प्रतिटोला लगावला आहे. “गिरीश महाजनांना मी सल्ला दिला होता की डिझेल, पेट्रोल, गॅसच्या वाढत्या किमतींबाबत मोर्चा काढला असता तर बरं झालं असतं. हे जिव्हारी लागण्याचं काही कारण नव्हतं. गिरीश महाजनांचं आंदोलन म्हणजे एक नौटंकी असते. कापसाला ७ हजार प्रतिक्विंटल भाव देऊ म्हणून त्यांनी एक नौटंकी केली होती. पण ते सरकारमध्ये मंत्री असतानाही हा भाव मिळाला नाही. फक्त नाटकं करायची ही त्यांची नेहमीची पद्धत आहे”, असं खडसे म्हणाले आहेत.

“दुश्मन ना करे, दोस्त ने वो…”, देवेंद्र फडणवीसांवर एकनाथ खडसेंची पुन्हा आगपाखड!

“मुख्यमंत्रीपदासाठी लायकी असावी लागते”

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जाण्याची देखील योग्यता असावी लागते, असं म्हणत एकनाथ खडसेंनी टोला लगावला आहे. “मुख्यमंत्रीपदावरून माझ्यावर सातत्याने ते टीका करत असतात. पण मुख्यमंत्रीपदाची लायकी असायला हवी. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जाण्याचीही योग्यता असली पाहिजे. त्यासाठी मेहनत असली पाहिजे. सर्व पक्षांनी मान्यता देण्यासारखं नेतृत्व असलं पाहिजे. फक्त पोरीबाळींच्या मागे लागून कुणी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जात नाही. नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्याच्या मेहनतीने गेला. जनतेच्या आशीर्वादाने गेला. मला अभिमान आहे की किमान उत्तर महाराष्ट्रात एका तरी व्यक्तीचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत गेलं. आत्तापर्यंत त्यांचं नावही कुठे येत नव्हतं. यांची नावं वेगवेगळ्या ठिकाणी जोडले जातात. अशा लोकांची मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण्याची योग्यता तरी आहे का?” असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp leader eknath khadse targets bjp girish mahajan on cm post protest pmw

ताज्या बातम्या