एकीकडे संपूर्ण देश करोना विषाणूशी लढत असताना, महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगळाच खेळ सुरु झाला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील शब्दांत टीका व ट्रोलिंगविरोधात भाजप नेत्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांचं एक शिष्ठमंडळ मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना भेटलं. यावेळी बोलत असताना आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील असंही दरेकर म्हणाले. विरोधीपक्ष नेत्यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

काही महिन्यांपूर्वी आघाडीत बिघाडी, देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र ही पेज सोशल मीडियावर कोण चालवत होतं. त्याच्या जाहिरातीचे पैसे कुठून आले याची माहिती भाजपने जाहीर करावी. आम्ही विरोधी पक्षात असताना विशिष्ठ गटाकडून आमच्यावर अश्लील टीका होत होती, त्यावेळी पोलीस तक्रारही नोंदवून घेत नव्हते. आज भाजपवर रचनात्मक टीका होत आहे तरीही भाजप नेत्यांना ते सहन होत नाही, रडीचा डाव खेळू नका अशा शब्दांत जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

याआधीही महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीवरुन जयंत पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला होता. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे सरकार अस्थिर करू पाहणाऱ्यांच्या हाती अपयश लागले आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थिर होतं. सरकार स्थिर राहील आणि करोनाविरोधातील लढा आम्ही यशस्वी करूच, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसंच शिवाय राज्याची अर्थव्यवस्थाही आम्ही पुन्हा सुदृढ करू, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.