scorecardresearch

नितीन गडकरींच्या मागे कोण लागलं आहे? राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जयंत पाटलांनी टीकास्त्र डागलं आहे

नितीन गडकरींच्या मागे कोण लागलं आहे? राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

या देशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं काम सोडलं तर मोदी सरकारचं कुठलंही काम पैलतिरापर्यंत पोहोचलं नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुलडाण्यातील एका कार्यक्रमादरम्यान केली. “आता गडकरींच्या मागेही कुणीतरी लागल्याचं दिसतंय” असं म्हणत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

“मंत्रीपद गेलं तरी मला काही फरक पडत नाही”, गडकरींच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा, व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर भाजपामध्ये गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, बुलडाण्यातील कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी विविध समस्यांबाबत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी जीवनावश्यक वस्तूंवर कर नव्हता, पेट्रोल-डिझेलने उच्चांक गाठला नव्हता, असे पाटील यावेळी म्हणाले. एकेकाळी ४०० रुपयांना मिळणारं सिलेंडर १२०० रुपयांपर्यंत महाग होईल, असं कधीही वाटलं नसल्याचं पाटील म्हणाले.

“ज्येष्ठांशी कसं वागावं, हे राहुल गांधींना माहित नाही” म्हणत काँग्रेसच्या आणखी एका नेत्याचा राजीनामा; आझाद यांच्यानंतर पक्षाला पुन्हा धक्का!

जनमताविरोधात राज्यांमधील सत्ता उलथवून भाजपाने मतदारांचा आणि भारतीय लोकशाहीचा अवमान केला आहे. आगामी निवडणुकीत हाच निवडणूक कार्यक्रम भाजपा जनतेसमोर मांडणार का? असा सवाल पाटील यांनी केला आहे. राज्यातील शिंदे-भाजपा सरकारलाही पाटील यांनी लक्ष्य केले आहे. “हे सरकार देवाणघेवाणीतून निर्माण झालं आहे. या देवाणघेवाणीचा आकडा ५० खोक्यांपर्यंत गेला आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे रुचेल असं वाटत नाही”, असं पाटील यांनी म्हटलं आहे. या सरकारने मतदारांचा अपेक्षाभंग केल्याने पुढील निवडणूक सोपी नसेल, असं भाकितही त्यांनी वर्तवलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.