“एकनाथ शिंदेंनी चोरून दहीहंडी फोडली” जयंत पाटलांचा खोचक टोला, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला आहे.

“एकनाथ शिंदेंनी चोरून दहीहंडी फोडली” जयंत पाटलांचा खोचक टोला, म्हणाले…
संग्रहित फोटो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून राजकीय टोलेबाजी करत दीड महिन्यांपूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली होती, असं विधान केलं आहे. त्यांच्या बोलण्याचा रोख हा शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीकडे होता. त्यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह १२ खासदार फोडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

“दीड महिन्यापूर्वी आम्ही ५० थरांची हंडी फोडली होती” या एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता जयंत पाटील म्हणाले की, “ही जी दहीहंडी आहे, ती बघायला किमान १५ ते २० हजार लोकं याठिकाणी जमले आहेत. सगळ्यांच्या समोर ही दहीहंडी फुटत आहे. पण एकनाथ शिंदे यांनी फोडलेली दहीहंडी ही गुप्तपणाने, चोरून कुठेतरी जाऊन फोडलेली आहे. त्याला महाराष्ट्राची अजून मान्यता नाही, त्यामुळे ती काही खरी दहीहंडी नाही” असं विधान जयंत पाटलांनी केलं आहे. ते पुण्यातील धायरी याठिकाणी रुपाली चाकणकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना हे विधान केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
टेंभी नाका येथे दहीहंडी पथकातील गोविंदांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव आता संपूर्ण महाराष्ट्रभर फोफावला आहे. मुंबईतला प्रत्येक गोविंदा टेंभी नाक्याला सलामी देऊन पुढे जातो. हा आपला इतिहास आणि परंपरा आहे. ही परंपरा वाढवण्याचं आणि जोपासण्याचं काम आपलं आहे. ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं आनंद दिघे यांचं स्वप्न होतं. त्यांच्या पुण्याईमुळे आणि आशीर्वादामुळे मला मुख्यमंत्री म्हणून या दहीहंडीला उपस्थित राहता आलं, हे मी माझं भाग्य समजतो.”

हेही वाचा- “त्यांनी स्पेनला जाऊन…” ५० थरांच्या दहीहंडीबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर अनिल परबांचा टोला!

“दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील सर्वात मोठी हंडी फोडली आहे. ती हंडी फोडणं तसं कठीण काम होतं आणि ती खूप उंचही होती. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही ती हंडी फोडू शकलो. आम्ही ५० थर लावले होते. हे थर आणखी वाढत जातील, याची काळजी करायचं काहीही कारण नाही” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp leader jayant patil on eknath shinde statement 50 layered dahihandi rmm

Next Story
धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा; म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माझा घात केला, इथून पुढे…
फोटो गॅलरी