आम्ही विरोधीपक्षाची भूमिका बजावणार : जयंत पाटील

पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल.

(संग्रहित छायाचित्र)

राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “जनतेनं आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही विरोधीपक्षाचीच भूमिका बजावणार असल्याचं” मत त्यांनी व्यक्त केलं. आज (बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, आमदार जयंत पाटील आणि आमदार नवाब मलिक यांची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही अंतर्गत स्पर्धा नाही. तसंच पक्षातील स्रव निर्णय शरद पवार हे पक्षातील सर्वांना विश्वासात घेऊनच घेत असतात. ते जो निर्णय घेतात तो अंतिम असतो,” असं गटनेतेपदाच्या नियुक्तीबाबत बोलताना पाटील म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. “पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. विरोधीपक्ष नेत्याबाबत शरद पवार हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्यात कोणाच्याही इच्छुकतेचा प्रश्न उद्भवतो असं वाटत नाही, ” असंही त्यांनी नमूद केलं.

तर दुसरीकडे नवाब मलिक यांनीही सरकार स्थापनेबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. “विधीमंडळामध्ये विश्वास ठरावानंतर भाजपाचे सरकार कोसळले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकारचा विचार करेल,” असे महत्वपूर्ण वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी केले आहे. महाष्ट्रातील विधानसभा निवडणुकींचे निकाल लागल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विश्वासदर्शक ठरावामध्ये सरकार पडले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकार स्थापन करण्याचा विचार करु शकते असं मत व्यक्त केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp leader jayant patil says we will sit in opposition maharashtra vidhan sabha election 2019 jud