मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. बहुचर्चित औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याशिवाय उस्मानाबादचं नामकरण धाराशीव करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला असून बैठकीत नेमकं काय घडलं याचा खुलासा केला आहे.

माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी आज वेगवेगळ्या विचारसरणीच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन काम करत असताना केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. दोन्ही पक्षांचं सहकार्य मिळालं, पण माझ्या पक्षाच्या काही लोकांनी दगा दिला, हे दुर्भाग्य आहे. त्यांनी साथ दिली नाही, याबद्दल दु:ख व्यक्त केलं. माझ्याकडून कुणाचा अपमान झाला असेल, किंवा कुणी दुखावलं असेल तर माफी मागतो,” असं मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची ही अखेरची बैठक आहे का? असं विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याबाबत कोणतंही भाष्य केलं नाही. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. न्यायालयाने सांगितलं तर उद्या विश्वासदर्शक ठराव होईल. त्यानंतर कळेल ही शेवटची बैठक आहे की नाही,” असंही पाटील म्हणाले.

याशिवाय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील काही निर्णय देखील घेण्यात आले आहेत. “राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार, अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार आहे.”