वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अलीकडेच मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानानंतर आता महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेत होते. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली आहे. या प्रकारानंतर सदावर्ते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा करणं, हा संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या १०५ हुतात्म्यांचा अपमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा देदीप्यमान इतिहास आहे. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणं इतकं सोपं नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- VIDEO: “स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू आणि…”, शरद पवारांचं नाव घेत सदावर्तेंचं मोठं वक्तव्य

यावेळी प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले की, गुणरत्न सदावर्तेंची मागणी म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. मला अशा वायफळ बडबड करणाऱ्या व्यक्तीवर जास्त बोलायला आवडत नाही. ज्या माणसाने दारू पिऊन शरद पवारांच्या घरात घुसखोरी करण्यासाठी पोरं पाठवली. त्यांच्याबद्दल मी काय बोलू? तो माणूस माझ्या दृष्टीने बोलण्याच्याही उंचीचा नाहीये.

हेही वाचा – “त्यांना हे सांगावं लागतं, यातच सगळं आलं”, उदय सामंतांच्या ‘त्या’ विधानावर ठाकरे गटाकडून सूचक विधान!

आव्हाड पुढे म्हणाले की, मुंबई मराठी माणसाकडून खेचून घेणार आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, असं कुणी म्हणणं म्हणजे त्याच्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यातून बाद होण्यासारखं आहे. मुंबई हा मराठी माणसाचा जीव की प्राण आहे. मुंबईसाठी अनेकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं इतकं सोपं नाही. संयुक्त महाराष्ट्र कसा निर्माण झाला, याचा देदीप्यमान इतिहास आहे. तो इतिहास लोकं कसा विसरतील?

हेही वाचा- गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचा राडा, घोषणाबाजी करत अंगावर शाईफेक

खरं तर, महाराष्ट्राला अस्थिर करण्याचं सध्या प्रयोजन आखलं गेलंय. गेल्या साडेचार महिन्यात जवळजवळ ३६ कंपन्या महाराष्ट्र सोडून बाहेर गेल्या, अशा प्रकारचं वृत्त काही वृत्तपत्रांनी दिलं आहे. त्यामुळे ही अस्थिरता महाराष्ट्राला खड्ड्यात घालणारी आहे, असंही आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jitendra awhad on gunratn sadavarte mumbai national territory rmm
First published on: 26-11-2022 at 14:31 IST