मी सावित्रीबाई फुले बोलतेय ही मालिका बंद पडणार आहे. अमोल कोल्हे हे या मालिकेत ज्योतिराव फुलेंच्या भूमिकेत तर मधुराणी गोखले प्रभुलकर ही अभिनेत्री या मालिकेत सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहे. ही मालिका बंद होणार असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खंत व्यक्त केली. तसंच नाना पाटेकर, प्राजक्ता माळी, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे कलाकार अशावेळी गप्प का बसतात असा सवालही त्यांनी केला.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

अमोल कोल्हेंनी जो विषय काढला की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची मालिका बंद करण्यात आली. २०१४ पासून म्हणजेच मोदी सरकार आलं तेव्हापासून विचारांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम मोदी सरकार सातत्याने करतं आहे. नथुरामाची भूमिका अमोल कोल्हे तुम्ही घेतलीत तेव्हा त्याचा सर्वात आधी विरोध करणारा मी होतो आणि मला त्याचा अभिमान आहे. मला शरद पवार साहेबही ओरडले होते की तू अशी भूमिका घ्यायला नको होतीस. मी भूमिका कधीही मागे घेत नाही. तुमच्या त्या भूमिकेला माझा विरोध होता आणि राहिल. मी नथुराम बोलतोय हे नाटक मी अनेकदा बंद पाडलंय, तेव्हा लाठ्या काठ्या खाल्ल्या आहेत. आता अमोल कोल्हे ज्योतिबांची भूमिका करत आहेत. त्यांच्या मालिकेसाठी मी १० लाख रुपयांची देणगी जाहीर करतो असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

नाना पाटेकर, प्राजक्ता माळी गप्प का?

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, मला हसू या गोष्टीचं येतं की नाना पाटेकर कायम एका स्टाईलमध्ये बोलत असतात. नाना पाटेकर थोर विचारवंतांपैकी एक आहेत. मग जेव्हा असे प्रसंग येतात, तेव्हा नाना पाटेकर असतात कुठे? महात्मा फुलेंची मालिका बंद पडली आहे तर नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी बोललं पाहिजे. प्राजक्ता माळी ताई आहेत त्यांनी बोलायला पाहिजे. मला आठवतं आहे की आणीबाणीचा काळ होता तेव्हा आंधी चित्रपटावर बंदी आली तेव्हा कैफी आझमी, देवानंद आणि इतर कलाकार इंदिरा गांधींविरोधात उभे राहिले. सर्वसामान्य आणि चित्रपटांचा जवळचा संबंध असतो. प्रत्येक जण स्वतःला त्या भूमिकेत बघायचा. अमिताभने एक ढिशूम केलं की खालून ढिशूमचे १०० आवाज यायचे. एवढे लोक चित्रपटात रममाण व्हायचे. आजची चित्रपट सृष्टी म्हणजे आप आम चुसके खाते हैं की काट के खाते हैं? हे विचारणारी आहे. इतकी लाचार फिल्म इंडस्ट्री मी कधी पाहिली नव्हती. अपेक्षा कुणाकडूनच नाहीत. दीपिका पादुकोण बोलली, पण तिचं काय झालं आपण पाहिलं. पण बोलण्याचं धारिष्ट्य तिने दाखवलं. पण आपण सगळ्यांनी मिळून मालिकेला मदत केली पाहिजे. सरकार ज्योतिबांच्या भूमिकेला आडवं जात असेल तर सरकारला आडवं गेलं पाहिजे असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेद्र आव्हाड यांची मोदींवरही जोरदार टीका

नेतृत्वात कसा फरक असतो बघा, डोनाल्ड ट्रम्प कधीही म्हणतो की मोदींचा राजीनामा मी पाहिजे तेव्हा घेऊ शकतो. आय कॅन सॅक मोदी इन टू मिनिट्स वगैरे. एका देशाचा अध्यक्ष एका देशाच्या पंतप्रधानावर टीका करतो की मी तुला दोन मिनिटांत घरी पाठवतो आणि हा देश शांत राहतो? त्यांचे समर्थक शांत बसतात? मला आजही आठवतंय की पाकिस्तानच्या विरोधात युद्ध केलं जाईल असं वातावरण होतं तेव्हा इंदिरा गांधी अमेरिकेला गेल्या होत्या. त्यावेळी निक्सन यांनी इंदिरा गांधींना सांगितलं की पाकिस्तानच्या अंतर्गत गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. त्यावेळी इंदिरा गांधींनी व्हाईट हाऊसमध्ये त्यांना सांगितलं होतं की माझ्या देशाचं नेतृ्त्व मी करते, लोकांनी मला निवडून दिलंय, बाजूच्या देशात अत्याचार होणार असतील तर ते थांबवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुमच्याकडून अक्कल शिकायला मी आलेले नाही. मला वाटतं असं सांगणारं नेतृत्व हवं.

ट्रम्पबाबत आव्हाड काय म्हणाले?

काय एपिस्टिन फाइलची कमाल आहे, ट्रम्पच्या हाती काही वेगळी कागदपत्रं आहेत का? तो मोदींना दम देण्याचं काम करतोय. पण तो मोदींना दम देत नाहीये. तर आपल्या देशाला दम देतो आहे. आपली इराणशी दोस्ती होती, तरीही आज जी काही तेलाची परिस्थिती ओढवली आहे ती फक्त ट्रम्पमुळे ओढवली आहे. इराण आपला दोस्त होता पण अमेरिकेच्या बाजूला जायचं म्हणून मोदी इस्रायला गेले, त्यानंतर इस्रायलने काय केलं? तर ज्यांची एक इंच मालकीची जमीन नव्हती त्या इस्रायलने पॅलेस्टाईनची जमीन ताब्यात घेतली. गाझा पट्टीत २० लाख लोक मारले गेले. इतका निष्ठुर आणि क्रूर समाज होणार असेल आणि आवाज उठणार नसेल तर काय बोलायचं? असा सवालही आव्हाड यांनी केला. पुण्यात दारुत काहीतरी मिसळलं गेलं आणि लोक मारली गेली. मला एक घोषणा द्यायची आहे ती म्हणजे वाह रे मोदी तेरा खेल सत्ता बेवडा महंगा तेल. आज पेट्रोल, डिझेल १०० रुपयांच्या वर गेला आहे. फक्त कांदा लासगावला स्वस्त आहे कारण शेतकरी मरतो आहे. ज्या कृषीमुळे अर्थव्यवस्थेला ताकद मिळते ती व्यवस्था धुळीला मिळायला आली आहे. RBI ला लपून छपून सोनं विकायला घेतलं आहे यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही असंही आव्हाड म्हणाले.