अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेच त्यांची चांद्रमोहीम यशस्वी झाली असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सोमवारी केलं. या वक्तव्यावरुन भिडे गुरुजींवर टीका केली जात असतानचा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही या वक्तव्यावरुन भिडे गुरुजींना  यांना लक्ष्य केले आहे. संभाजी भिडे गुरुजींची वक्तव्ये महाराष्ट्रातील लोकांना आवडतात त्यामुळे मी त्याबद्दल कोणतीच भावना व्यक्त करणार नाही असं आव्हाड यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ ही मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यात चंद्राच्या भूपृष्ठापासून केवळ २.१ किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा इस्रोशी संपर्क तुटला. त्यामुळे सर्वच भारतीय हळहळले. मात्र त्याच वेळी संपूर्ण देश इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या पाठिशी उभा राहिल्याचे दिसले. असं असतानाच भिडे गुरुजींनी अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्याने ते यशस्वी झाल्याचे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याच वक्तव्यावरुन आव्हाड यांनी ट्विटवरुन खोचक शब्दांमध्ये भिडे गुरुजींवर टिका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, ‘मी निश्चय केला आहे.  परमपूज्य भिडे गुरुजींबद्दल काहीच भावना व्यक्त करणार नाही. त्यांची वक्तव्ये महाराष्ट्रातील लोकांना आवडतात.’ यानंतर त्यांनी दोन ट्विटमध्ये भिडे गुरुजींनी केलेली आठ वक्तव्यांची यादीच पोस्ट केली आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये पोस्ट केलेल्या वक्तव्याची यादी पुढीलप्रमाणे –

१) नेहरू मूर्ख होते.

२) गांधीवाद हा देशाला लागलेला रोग आहे.

३) जास्त शिकलेला माणूस हा सुपर गां* असतो.

४) मनू हा संतांपेक्षा श्रेष्ठ होता.

५) संभाजी महाराजांना अक्कल नव्हती.

६) सगळ्या म्लेंच्छाना मारून टाका

७) अमेरीकेने एकादशीला यान सोडले म्हणून ते यशस्वी झाले.

८) माझ्या बागेतील आंबा खाऊन मुलगा होतो.

या ट्विटच्या शेवटी आव्हाड यांनी ‘ही सगळी वक्तव्य विज्ञानवादी महाराष्ट्रात झाली. मी निःशब्द आहे,’ असा टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते भिडे गुरुजी?

सोमवारी पुण्यामधील एका कार्यक्रमादरम्यान चांद्रयान मोहीमेबाबत भिडे गुरुजींना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अमेरिकेची चांद्रयान मोहिम आणि एकादशीचा संबंध सांगणारे वक्तव्य केले. “भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नाही. एक सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची पद्धतही भारतीय कालमापन पद्धतीत आहे. अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा उपयोग केला म्हणूनच अमेरिकेची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली. अमेरिकेने आत्तापर्यंत ३८ वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न फसला. तेव्हा नासाच्या एका वैज्ञानिकाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि उपग्रह एकादशीच्या दिवशी सोडला. ज्यामुळे अमेरिकेची मोहीम यशस्वी झाली. एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडातली स्थिती संतुलित असते. त्याचमुळे प्रयोग यशस्वी झाला” असंही संभाजी भिडे गुरुजी यांनी म्हटलं आहे.