Najeeb Mulla on Sahar Sheikh Statement : “कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” , असं नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं होतं. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर, सहर शेख यांनी माफीनामा देऊन हे प्रकरण दप्तरी नोंदवण्यात आलं. मात्र, त्यानंतर इम्तियाज जलील यांनी सहर शेखची पाठराखण करत तिच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. यावरून पुन्हा वाद निर्माण झालाय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नजीब मुल्ला यांनी सहर शेख आणि जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

“मुंब्र्यात फक्त तिरंगा चालेल, हिरवा नाही”, असं नजीब मुल्ला म्हणाले. ते म्हणाले की, “ती लहान-बालिश आहे. तिच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. निवडून आल्यानंतर तिने तरुणांना मदत केली पाहिजे. शिकवलं पाहिजे. पण तिने उसकवण्याचा प्रयत्न केला. विषय संपलेला असताना त्यात तेल टाकण्याचं काम केलं. याचा निषेध आहे. मुंब्र्यात फक्त तिरंगा चालेल.” तसंच, मुंब्रासहित संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करून दाखवू असं इम्तियाज जलील म्हणाले होते, त्याविषयी विचारलं असता नजीब मुल्ला म्हणाले की, त्यांनी निवडून आलेल्या त्यांच्या पाच लोकांना सहा महिने टिकवून ठेवावं.”

जितेंद्र आव्हाडांची आज रॅली

दरम्यान, सहार शेख प्रकरणानंतर आज, मंगळवारी मुंब्र्यात राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाच्या वतीने विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सत्कार करण्यात येणार असून, दर्गाह गल्ली येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५:३० वाजता मुंब्रा रेल्वे स्थानक येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण केल्यानंतर रॅलीचा समारोप दर्गाह गल्ली येथे होईल. त्यानंतर दर्गाह गल्ली येथे आयोजित सभेत जितेंद्र आव्हाड मार्गदर्शन करणार आहेत.

जितेंद्र आव्हाडांच्या या रॅलीवरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाडांच्या रॅलीला बॉलिवूडचे अॅक्टर्स येणार असतील. त्यांची अॅक्टिंग चालू असेल. त्यांच्या रॅलीला आम्ही महत्त्व देत नाही. तसंत, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं असेल म्हणून किरिट सोमय्या यांनी पोलीस तक्रार केली असेल.”

ठाणे महापालिका निवडणुकीत आमदार आव्हाड यांनी सहरला उमदेवारी नाकारली. यामुळे तिने एमआयएम पक्षाची उमेदवारी आणून निवडणूक लढवली. यात विजय झाल्यानंतर ” कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” असे वक्तव्य करत तिने आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचले होते.