करोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत भाजपाने आज ‘माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलनाची हाक दिली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज असल्याचं म्हणत पवार यांनी भाजपाच्या आदोलनावर टीका केली आहे.

“मास्क वापरण्याचा आणि अंतर ठेवण्याचा नियम वगळता हे सगळं नाटकाच्या स्क्रिप्टप्रमाणेच वाटलं. आज राज्याला अशा नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो, राज्यातील लोकांचा आणि कोरोना वॉरियर्सचा अपमान करू नका,” असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून भाजपाच्या आंदोलनावर निशाणा साधला.

आणखी वाचा- …ते आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत, व्वा !; राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपाला टोला

आणखी वाचा- भाजपसोबत जाऊन महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना?; जनतेने विचार करावा : जयंत पाटील

“राजकारण न करण्याचं अनेकदा आवाहन करुनही तुम्ही ते टाळूच शकत नाही का? एकतर लोकांच्या हक्कासाठी आणि कोणत्याही उत्स्फूर्त आंदोलनासाठी अशा लिखित मार्गदर्शनाची गरज नसतेच. पण तुम्ही एखाद्या दिग्दर्शकाप्रमाणे कपडे, रंग, मीडिया, घोषणा, अंतर असं सगळं कसं लिहून दिलं,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- देवेंद्रजी तुमच्या अंगणात काँग्रेस कार्यकर्ते मदत करतायत ! बाळासाहेब थोरातांचा फडणवीसांना टोला

“आधी म्हणायचं ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? आणि आता महाराष्ट्र बचावचे गळे काढत अंगणालाच रणांगण करायचं. अरे किती हिणवणार? रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या करोना योद्धांचा आंदोलनाच्या नावाने अपमान तरी करू नका. राज्याचा एवढाच कळवळा आहे तर संकटात तरी एकदिलाने काम करत महाराष्ट्र घडवू,” असं आवाहनही रोहित पवार यांनी केलं आहे.