scorecardresearch

“माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी आईने सभागृहात नेलं होतं, त्यामुळे…”, शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा

“जेव्हा-जेव्हा मला सभागृहात काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा…”

sharad pawar
शरद पवार ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

जागतिक महिला दिनानिमित्त राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तत्वाचा’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मातोश्री शारदाबाई पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आईने तिसऱ्या दिवशी सभागृहात नेल्याने सर्व सभागृह पाहण्याची संधी मिळाली, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

शरद पवार म्हणाले, “माझ्या मातोश्री स्वातंत्र्य चळवळीत होत्या. चळवळीनंतर समाजकारण त्यांचं लक्ष होतं. तेव्हा जिल्हापरिषद नव्हती, ‘जिल्हा लोकल बोर्ड’ होतं. सबंध जिल्ह्यातून एक महिला जिल्हा लोकल बोर्डावर जायची. त्यावेळी पुणे जिल्ह्यातून माझ्या मातोश्री बोर्डावर गेल्या. त्यांचं वैशिष्ट असं होतं, त्या कधीही लोकल बोर्डाच्या बैठकीला उशीरा जायच्या नाहीत, किंवा गैरहजर राहायच्या.”

हेही वाचा : हक्कभंगाच्या नोटिशीला संजय राऊतांनी दिलं उत्तर; नेमकं काय म्हटलं पत्रात?

“एकदिवशी त्यांनी एका मुलाला जन्म दिला. बाळंतपण आटोपलं. लोकल बोर्डाची बैठक असल्याने तिसऱ्या दिवशी बाळाला घेऊन बारामतीवरून पुण्याला खासगी बसने गेल्या. ते तीन दिवसांचं बाळ म्हणजे मी. विधानसभा, लोकसभा आणि अन्य ठिकाणी जायची संधी मिळाल्याने माझं कौतुक होतं. मात्र, माझ्या आईने तिसऱ्या दिवशी सभागृहात नेलं होतं. तिसऱ्या दिवशी सभागृह पाहिल्यामुळे ५६ वर्षे सतत विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. याचं श्रेय मातेला द्यावं लागेल, यात शंका नाही,” अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली.

हेही वाचा : “…म्हणून भाजपा आणि शिंदे गटातील महिला आमदार तणावाखाली”; ठाकरे गटातील आमदाराचं विधान

“जेव्हा-जेव्हा मला सभागृहात काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा सतत समाजातील लहान घटकांना वर आणण्यासाठी सत्तेचा वापर केला. त्यात दलित, अल्पसंख्याक, महिला भगिनी हे सर्व घटक समाविष्ट होते,” असं शरद पवारांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 17:36 IST
ताज्या बातम्या