Shashikant Shinde on NCP Merger : अजित पवार यांच्या अकस्मित निधनामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची प्रक्रियाही त्यामुळे रखडली. दरम्यान, हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू होती, मात्र ही चर्चा काय होती याबाबत माहिती नाही, असं अजित पवारांचे नेते म्हणत आहेत. तर, ही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचून पक्षाचं एकत्रीकरण १२ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार होतं, असं शरद पवारांचे नेते म्हणत आहेत. दरम्यान, या चर्चांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने मोठी भूमिका जाहीर केली आहे. या चर्चेत आता कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.
शशिकांत शिंदे यांचा ‘राष्ट्रवादी’ या मासिकात लेख छापून आला आहे. त्यात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. तसंच, दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होऊन अजित पवारांकडे नेतृत्व देण्यात येणार होतं, असंही म्हटलं आहे. या लेखानंतर शशिकांत शिंदे चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून याबाबत आज माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते म्हणाले, “दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणासंदर्भात निर्णय झाला होता. अजित पवारांचे नेतेही याबाबत बोलत आहेत. पण आता आम्ही हा विषय बंद केला आहे. आम्हीच मागे लागलोय असं चित्र निर्माण केलं जातंय. आमच्याकडून अजिबात गडबड नाही. आम्ही सत्य बोललो. पण आता यावर भाष्य करायचं नाही असं ठरवलंय.”
…तर मी माझे शब्द मागे घेतो
“राष्ट्रवादी पक्ष पुन्हा जोमाने काम करण्याची भूमिका घेतोय. त्यामुळे विलीनीकरणावर मी बोलणार नाही. अजितदादांची चूक झाली आहे असं मी म्हटलं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. अजित दादांना त्या झालेल्या पक्षाच्या विभाजनाबाबत दुरुस्ती करायची होती. अजितदादा भावनिक होते. शरद पवारांच्या भेटीतही अजितदादांनी कधीच नजरानजर केली नाही”, असंही शशिकांत शिंदे म्हणाले.
आता नो कॉमेट्ंस
“विलीनीकरणाच्या चर्चेवर ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही भावना व्यक्त केली. अनेकांनी भावना व्यक्त केली. निवडणूक झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार होता. विलीकरणाचं सूत्र कसं असेल याबाबत चर्चेत ठरवलं जाणार होतं. चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, त्यामुळे आम्ही जर-तरवर चर्चा करण्यात अर्थ नाही. आता यावर आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही. No Comments”, असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी या विषयावर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

