राज्यात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपानं ‘माझं अंगण रणांगण’ आंदोलनाची हाक दिली. भाजपाच्या या आंदोलनावर सत्ताधारी पक्षांनी टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपावर टीकेची तोफ डागली आहे.

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून महाराष्ट्र भाजपानं आंदोलन सुरू केलं आहे. भाजपाच्या माझं अंगण रणांगण आंदोलनावर महाविकास आघाडीतील पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनीही या आंदोलनावरून भाजपाला उपरोधिक टोला लगावला आहे. “महाराष्ट्र पाण्यात बुडत असताना ज्यांनी शांतपणे पाहिला, संकटकाळातील निधी ज्यांनी दिल्लीला पाठवला, शेतकरी आत्महत्येचा आलेख ज्यांनी चढता ठेवला ते आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत व्वा! राजकुमार यांचा एक गाजलेला डायलॉग ‘कव्वे की चोंच मारने से पहाड नहीं तुटते’, असं ट्विट करत मिटकरी यांनी टीका केली आहे.

आणखी वाचा- राज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज; रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

आणखी वाचा- भाजपसोबत जाऊन महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना?; जनतेने विचार करावा : जयंत पाटील

मिटकरी यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाच्या आंदोलनावर टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेलाही आवाहन केलं आहे. “हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा. आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना? असा विचारही जनतेने मनात आणावा,” असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.