Sunil Tatkare on NCP Merger: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे अजित पवार गटाच्या नेत्यांवर टीका होऊ लागली. अजित पवारांचा मृत्यू झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली गेली. शपथविधीची घाई का करण्यात आली? असा प्रश्न शरद पवार गटाकडून उपस्थित करण्यात आला. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली नव्हती, असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. या सर्व प्रश्नांवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.
एबीपी माझा वृत्तवाहिनीला सुनील तटकरे यांनी सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलत असताना त्यांनी विलीनीकरणाची चर्चा फेटाळून लावली. अजित पवारांशी विलीनीकरणाची चर्चा झाली असती तर त्यांनी आम्हाला याबद्दल नक्कीच माहिती दिली असती, असे सुनील तटकरे म्हणाले.
अजित पवारांचे ज्या दिवशी निधन झाले, त्यानंतर अंत्यसंस्कार विधी पूर्ण होण्याआधीच शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विलीनीकरणाची चर्चा सुरू करण्यात आली. शपथविधीवर टीका करणाऱ्यांनी याबाबतीतही बोलावे. हीदेखील घाई नव्हती का? असा सवाल सुनील तटकरे यांनी उपस्थित केला.
विलीनीकरणानंतर इतर कुणाला उपमुख्यमंत्री व्हायचे होते का?
सुनील तटकरे पुढे म्हणाले, “शरद पवार गटच्या एका नेत्याने दावा केला की, ते पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांबरोबर त्यांची कोणत्या टप्प्यावर काय काय चर्चा झाली हे ते जाहीर करणार आहेत. त्यांनी जाहीर केल्यानंतर आम्ही त्यावर बोलू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला नेता निवडणे आणि त्याला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देणे आणि विलीनीकरण करणे, हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. विलीनीकरणानंतर दुसऱ्या कुणाला उपमुख्यमंत्री व्हायचे होते का? वारंवार याची चर्चा का केली जात आहे? असा उलट सवाल सुनील तटकरे यांनी उपस्थित केला.”
राष्ट्रीय अध्यक्षाचा विषय कधी मार्गी लागणार?
अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय मार्गी लागल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? हा प्रश्न पक्षासमोर आहे. याबाबत प्रश्न विचारला असताना सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत प्रफुल पटेल आणि मी वारंवार भूमिका व्यक्त केलेली आहे. आमदार आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेईल. संघटनेच्या बाबतीतले निर्णय लवकरात लवकर घेतले जातील.
सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेवर कोण?
राज्याच्या मंत्रिमंडळात किंवा केंद्रीय मंतिमंडळात त्या सभागृहाचा सदस्य नसतानाही शपथ घेता येऊ शकते, अशी अनेक उदाहरणे आजवर घडली आहेत. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेचा मुद्दा आमच्यासमोर आहे. त्यातील तांत्रिक बाजू पाहून निर्णय घेतला जाईल, असेही सुनील तटकरे म्हणाले.

