उपोषण सोडा, लोकांची कामं करा, सुप्रिया सुळेंचा भाजपाला सल्ला

पुण्याचे पालकमंत्री कोण हे लोकांना माहीत नव्हते. जेव्हा त्यांची जीभ घसरली तेव्हा लोकांना नाव माहीत झालं, असा खाेचक टोला गिरीश बापट यांना लगावला.

supriya sule, ncp

विरोधी पक्षांविरोधात भाजपाने आज केलेल्या एकदिवसीय उपोषणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घणाघाती टीका केली. भाजपाचे लोक आज उपोषण करीत आहेत. आज एकादशी आहेच, लोक आज असाही उपवास करतातच. भाजपच्या लोकांचे हे उपोषण ढोंगी आहे. लिंबू सरबत पिऊन कोणतं उपोषण होतं का, असा सवाल करत उपोषण सोडा आणि थोडं काम करा असा सल्ला दिला. दौंड येथील हल्लाबोल यात्रेत त्या बोलत होत्या.

या सरकारने चांगली नावे देऊन योजना जाहीर केल्या पण त्या योजनांना निधीच दिला नाही. त्यातल्या काही योजना तर फसव्या निघाल्या. मोठ्या दिमाखात जाहीर केलेल्या योजनांचे पुढे काहीच झाले नाही. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना दौंड भागातील मुद्दे प्रलंबित नसायचे. पण आताचे पालकमंत्री कोण हे लोकांना माहीत देखील नव्हते. जेव्हा पालकमंत्र्यांची जीभ घसरली तेव्हा लोकांना त्यांचं नाव माहीत झालं, असा खाेचक टोला गिरीश बापट यांना लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना त्या म्हणाल्या, दौंड तालुक्यातील शेतकरी आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही. ते दौंडमध्ये आले पण शेतकऱ्यांना भेटले नाही. शेतकऱ्यांनी लाँग मार्च काढला पण त्यांनी दुर्लक्ष केले मोर्चात महिला सहभागी झाल्या होत्या. चालून चालून त्यांच्या पायाला जखमा झाल्या मात्र मुख्यमंत्र्यांना पाझर फुटला नाही.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनीही भाजपाच्या उपोषणाची खिल्ली उडवली. संसदेचे कामकाज चालत नाही म्हणून जर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपोषणाला बसत असतील तर ही गंभीर गोष्ट आहे. बहुमत असताना पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उपोषणाला बसावे लागत असेल तर आजची तारीख इतिहासात नोंदली जाईल. भाजपकडे प्रचंड बहुमत आहे. संसद चालवणे हे सत्ताधारी पक्षाच्या हातात असते. भाजपला माहिती आहे की ते पुढच्या निवडणुकांनंतर विरोधी पक्षात असणार. त्यामुळे आतापासूनच आंदोलनांची सवय लावून घेत आहेत, असे ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp leader supriya sule criticized on bjp on one day fast guardian minister girish bapat in hallabol rally in daund