सोमवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीला अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण करण्याचा विचार करत असून, यादरम्यान दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांना बाजूला केले जात असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या.
नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या सहा ज्येष्ठ नेत्यांची भेट झाल्यानंतर पक्षात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून, ही भेट आधीच निश्चित झालेली होती, असे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना बाजूला सारले जात असल्याचा दावा पक्षाने पूर्णपणे फेटाळून लावला असून, पक्षात कोणतेही मतभेद नसून पक्ष पूर्णपणे एकसंध असल्याचे सांगण्यात आले आहे.
भेटीवरून उठलेल्या वावड्या निरर्थक आणि दिशाभूल करणाऱ्या: उमेश पाटील
‘इंडिया टूडे’च्या वृत्तानुसार, या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. “ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याच्या आणि पक्षात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याच्या बातम्या पूर्णपणे असत्य, बिनबुडाच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत,” असे वक्तव्य त्यांनी केले.
उमेश पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, अमित शाह यांच्यासोबत झालेली ही बैठक अचानक ठरलेली नव्हती तर तिचे नियोजन आधीच झाले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी स्वतः दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. त्याच बैठकीदरम्यान, पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ लवकरच भेट घेईल, असे सुनेत्रा पवार यांनी शाह यांना सांगून ही वेळ मागून घेतली होती.
मतदारसंघाचे प्रश्न अन् महायुतीतील ताळमेळ
या बैठकीत नेत्यांनी पक्षाचे संघटन, महाराष्ट्रातील विविध विकासकामे आणि आपापल्या मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. याशिवाय, दिल्लीत उपस्थित असलेल्या महायुतीच्या इतर घटक पक्षांतील नेत्यांसोबतही अनौपचारिक संवाद साधण्यात आला, अशी माहिती पाटील यांनी दिली.
“काही घटकांकडून या औपचारिक भेटीला विनाकारण राजकीय रंग देण्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताळमेळ नसल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी हा महायुतीचा एक महत्त्वाचा आणि मजबूत घटक पक्ष असून, सुनेत्रा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण पक्ष एकसंधपणे काम करत आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
