मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची शक्यता दाट होत असताना भाजपकडून पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार आहे. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणानंतरही राष्ट्रवादीचे नियंत्रण शरद पवारांच्या हाती जाऊ नये, यासाठी ही खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अजित पवार यांच्या मृत्यूपश्चात, राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून गुरुवारी विलीनीकरणाच्या विषयाला वाचा फोडण्यात आल्यानंतर नेतृत्वाचा प्रश्न निकालात निघेल, असे बोलले जात होते. मात्र, याला राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटासह भाजपचाही विरोध असल्याचे बोलले जाते. अजित पवार यांच्या पक्षावर सुनेत्रा पवार यांचा वरचष्मा राहील या दृष्टीने भाजपने सारी व्यूहरचना केली आहे.

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करून लगेचच त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये समावेश केला जाईल. सुनेत्रा पवार यांच्याकडे  पक्षाची सूत्रे सोपविल्याने भाजपला राष्ट्रवादीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल, हे त्यामागचे गणित आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पक्षाच्या भवितव्याबाबत चर्चा केली. सुनेत्रा पवार यांची नेतेपदी निवड करून त्यांचा सरकारमध्ये समावेश करण्यास फडणवीस यांनी होकार दिला आहे.

 राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा गेली अनेक दिवस सुरू आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात होती, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी गुरुवारीच केला होता. विलीनीकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार होती व तशी अजित पवारांशी चर्चा झाल्याचेही  शरद पवार गटाकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र आले तरी राष्ट्रवादीचे नेतृत्व पवार गटाकडे जाऊ नये, असा भाजपचा प्रयत्न आहे. कारण पुढील निवडणुकीत राज्यात प्रबळ विरोधी पक्ष तयार होऊ नये, असा भाजपचा प्रयत्न असेल. राष्ट्रवादीतील फुटीत भाजपचा हात असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून नेहमी केला जातो. त्यामुळे एकत्रित राष्ट्रवादीवर पूर्ण नियंत्रण आल्यास पवार गटाकडून भाजपसमोर आव्हान उभे केले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रवादीतील आणि पवार कुटुंबातील नेतृत्वसंघर्ष कायम ठेवण्यासाठी ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.

प्रफुल पटेल – तटकरे यांच्यात मतभेद?

अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते असलेले प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात नेतृत्वावरून स्पर्धा निर्माण झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशा वेळी सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवल्यास राष्ट्रवादीत चलबिचल होणार नाही, अशी पक्षांतर्गत भूमिका आहे. मात्र, पटेल आणि तटकरे यांच्यात केंद्रात मंत्रीपद मिळवण्यासाठीही चढाओढ सुरू असल्याने सध्याचा तोडगा कितपत प्रभावी ठरतो, याबाबत संभ्रम आहे.

सुनेत्रा पवार यांचा आज शपथविधी

मुंबई : अजित पवार यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांचा शनिवारी शपथविधी होणार आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी पवार यांची निवड केली जाईल. अजितदादांच्या निधनानंतर चारच दिवसांत सुनेत्रा पवार या मोठी जबाबदारी स्वीकारणार आहेत.