मुंबई : अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला होकार दिला होता व त्याची घोषणा १२ फेब्रुवारीला करण्यात येणार होती, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या या दाव्याचे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जोरदार खंडन केले. १७ जानेवारी रोजी बारामतीला अजित पवार यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली होती, ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासदंर्भातली होती, असा दावा तटकरे यांनी केला.

‘आपली आणि अजित पवारांची पक्ष विलीनीकरणाची चर्चा झाली होती, १२ फेब्रुवारी रोजी त्याची घोषणा करण्यात येणार नाही’, असा दावा शरद पवारांनी आज सकाळीसकाळी केला होता. पवार यांच्या या दाव्यानंतर सुनेत्रा पवार यांचा घाईघाईने शपथविधी का उरकण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पवारांच्या दाव्यानतंर शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनी सुद्धा त्या बैठकीत पक्ष विलीनीकरणाबाबत चर्चा झालेली आणि सर्व काही ठरले होते, असे वक्तव्य करत शरद पवार यांच्या म्हणण्याला पुष्टी दिली आहे.

शरद पवार यांच्या एकत्रीकरणाबाबतच्या विधानाचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळातील आजच्या बैठकीवर पडले. या बैठकीसाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना माध्यम प्रतिनिधींनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण करण्यासाठी भंडावून सोडले. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर आपल्याला काही बोलायचे नाही. पक्षातील भावना लक्षात घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असे सांगितले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘बारामतीच्या त्या बैठकीला आपण नव्हतो, त्याची काही कल्पना नाही’, असे म्हणत कानावर हात ठेवले.

तटकरेंचा गौप्यस्फोट :

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सविस्तर खुलासा केला. ‘बारामतीची ती १७ जानेवारीची बैठक झालेली. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह काही नेते त्या बैठकीला उपस्थित हाेते. त्याचा व्हिडीओ सुद्धा दाखवला जात आहे. मात्र, ती बैठक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी नव्हती, तर स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात होती. त्या दिवशी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन होते. त्यासंदर्भात दोन्ही पक्षाचे नेते एकत्र जमले होते. त्या बैठकीत जी चर्चा झाली, त्याची माहिती अजित पवार यांनी त्याच दिवशी माध्यमांना दिलेली ’, असे म्हणत तटकरेंनी शरद पवार यांचा दावा खोडून काढला.