पंढरपूर : मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चाळीस वर्षांपासून आहे. या काळात किती मराठा मुख्यमंत्री झाले.परंतु शिवसेनेचे मनोहर जोशी तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काम केले. आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्ती असावी लागते. यांची इच्छाशक्ती नाही असा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला. पंढरपूर येथे ते बोलत होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस किती दिवस मराठा समाजाचा वापर मतासाठी करणार असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ४ जुलै रोजी सोलापूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी नरेंद्र पाटील हे प्रत्येक तालुक्याला भेट देणार असून बैठका घेणार आहेत. याचा शुभारंभ संत नामदेव पायरी येथे नारळ फोडून करण्यात आला. या वेळी आ. प्रशांत परिचारक, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अर्जुन चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, नगरसेवक विक्रम शिरसट, किरण भोसले, सागर यादव, सागर चव्हाण, सुमित शिंदे, शाम साळुंखे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना नरेंद्र पाटील यांनी पवारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर हा मराठय़ांचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. सर्वाधिक मराठा कार्यकर्ते व आमदार याच पक्षात होते. तरीही आरक्षण मिळाले नाही. समाजाचा वापर किती दिवस फक्त मतदानासाठी करणार असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.

मराठा समाजाच्या पाठोपाठ ओबीसी समाजदेखील राजकीय आरक्षणासाठी आंदोलन करीत आहे. परंतु आमच्यात व त्यांच्यात कोणताच वाद नाही. किंबहुना मराठा व ओबीसी एकत्र आले तर सरकारला तत्काळ दखल घ्यावी लागेल असे ते म्हणाले. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चाळीस वर्षांपासून आहे. या काळात किती मराठा मुख्यमंत्री झाले. परंतु शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला. जे या दोघांच्या काळात झाले ते इतरांच्या काळात का होऊ शकले नाही. याचा अर्थ आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्ती असावी लागते अशी टीकाही त्यांनी केली.