गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चाही सुरू आहेत. यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरून यू-टर्न घेतला होता. आता याच मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना आता आम्ही पूर्णविराम दिला असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. ‘माझ्या भावाची इच्छा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची होती. पण आता तशी भावना त्या बाजूने येत नसल्यामुळे आम्ही विलीनीकरणाच्या विषयाला पूर्णविराम दिला आहे’, असं सुप्रिया सुळे यांनी आज (१७ जुलै) दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरून सुनील तटकरे यांनी यू-टर्न घेतला. याबाबत पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आज माझा भाऊ राहिला नाही. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना आम्ही पूर्णविराम दिला आहे. माझा भाऊ जाऊन जवळपास पाच महिने झाले. आम्ही आता कुठे कुटुंब म्हणून सावरतोय. माझ्या भावाची शेवटची इच्छा होती की, दोन्ही पक्ष एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राज्याची आणि देशाची सेवा करावी. माझ्या भावाची इच्छा पूर्ण करण्याची माझी इच्छा दादा असतानाही होती आणि दादा गेल्यानंतरही होती. मात्र, आता तशी भावना त्या बाजूने येत नाही. त्यामुळे माझ्या मनात आणि आमच्या पक्षात त्या विषयाबाबत आम्ही पूर्णविराम दिला आहे”, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
“राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर आमचे काही नेते सुरुवातीलाच बोलले होते. पण समोरच्यांनी सांगितलं की असं काही झालेलं नाही. त्यामुळे आम्हाला खूप दु:ख आणि वेदना झाल्या. एकतर माझा भाऊ गेला, त्यामुळे माझ्या भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे सर्वाचे प्रयत्न होते. कारण दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव माझ्या भावाचा होता. पण आता आम्ही विलीनीकरणाचा विषय संपवलेला आहे. आम्ही स्वाभीमानी लोक आहोत. आता आम्ही विलीनीकरणाच्या विषयाला पूर्णविराम दिलेला आहे”, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.
