मुंबई : अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या चारच दिवसांत सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी करण्यात आलेली घाई, शपथविधीची काहीच माहिती नसल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे विधान, तर दोन्ही राष्ट्रवादींची केवळ महापालिका निवडणुकांपुरतीच आघाडी झाली होती, असा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा दावा या सार्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणात खंड पडल्याचेच एकूण चित्र आहे. भाजपला अपेक्षित अशी खेळी अजित पवार गटाचे नेते करू लागल्याने अशा परिस्थितीत विलीनीकरणाची प्रक्रिया कठीण असल्याचे मानले जात आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या चारच दिवसांत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उरकल्याबद्दल टीका होऊ लागली आहे. यातच सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. शपथविधी आहे की नाही याची आपल्याला काहीच कल्पना नाही, असे विधान शरद पवारांनी सकाळीच केल्याने दोन्ही राष्ट्रवादीत अंतर वाढल्याचा अर्थ काढला जाऊ लागला. शरद पवार यांना काहीही पूर्वकल्पना न देताच सुनेत्रा पवार शुक्रवारी मध्यरात्री बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या. यावरून सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबीयांना अंधारात ठेवले होते.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यावर लगेचच शपथविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजपच्या इशार्यावरून लगेचच शपथविधी उरकल्याचे स्पष्ट होते. या शपथविधीबाबत शरद पवारांना अंधारात ठेवण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणातच खोडा घालण्याचा हा प्रयत्न होता, असा शरद पवार गटाचा समज झाला आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सारी तयारी पूर्ण झाली होती.
माझ्यात व अजित पवारांमध्ये चर्चाही झाली होती. १२ फेब्रुवारीला या विलीनीकरणाची घोषणा करण्यात येणार होती, असे शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अजित पवार गटातील प्रफुल पटेल व सुनील तटकरे हे विलीनीकरणासाठी फारसे अनुकूल नाहीत. त्यातूनच विलीनीकरणाच्या प्रक्रियेला फांदे फोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे बोलले जात आहे. दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी ही फक्त महापालिका निवडणुकांपुरतीच होती, असे विधान अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केल्याने या संशयाला बळच मिळते, असे शरद पवार गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
भाजपची भूमिका निर्णायक
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात भाजपची भूमिका महत्त्वाची व निर्णायक असेल. शरद पवारांकडे पक्षाची सूत्रे जाऊ नयेत, अशीच भाजपची खेळी आहे. पवारांना महत्त्व देऊन २०२९च्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे आव्हान नको अशी त्यामागची भाजपची भूमिका आहे. याशिवाय विलीनीकरणानंतर सुप्रिया सुळे यांची भूमिका काय असेल, हा पटेल व तटकरे यांच्यापुढे प्रश्न आहे. या सार्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्याकडे सूत्रे सोपविण्याची घाई करण्यात आली. विलीनीकरण करायचे झाल्यास ते सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली व्हावे, अशी त्यामागची खेळी आहे. यामागे भाजपची व्यूहरचना असल्याचे स्पष्टच आहे. भाजपच्या चालीनुसारच राष्ट्रवादीचे भवितव्य ठरणार आहे.
सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य होणार का ?
शरद पवार आणि अजित पवार यांचे नेतृत्व दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांना मान्य होते. सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व शरद पवार गटातील नेत्यांना मान्य होणार का, हा प्रश्न आहे. याशिवाय विलीनीकरणानंतर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्षपदी नको ही शरद पवार गटाची अट होती. अजित पवारांनी ती मान्य केली होती, असे आता सांगण्यात येत आहे. विलीनीकरण झालेच तर तटकरे यांना पदावरून दूर केले जाईल का, असे अनेक प्रश्न आहेत. या सार्या पार्श्वभूमीवर विलीनीकरणाची प्रक्रिया आता सहज व सोपी राहिलेली नाही. सुनेत्रा पवार यांना राजकीय अनुभव नसल्याने निर्णय प्रक्रियेत पटेल, तटकरे यांचा सल्ला त्यांच्यासाठी महत्त्वाचा असेल.
सुनेत्रा पवारांकडे अर्थ वगळता इतर खाती
मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आलेले नाही. तूर्त हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहील आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर अर्थ खात्यावर निर्णय घेतला जाणार आहे. दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेली उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ ही तीन खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपावण्यात आली आहेत.
उत्पादन शुल्क खाते सोपविणे कसे औचित्याचे?
उत्पादन शुल्क म्हणजेच मद्याशी संबंधित खाते सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आले. अजित पवारांकडेही हे खाते होते. सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार हे मद्य व्यवसायात आहेत. त्यांच्या कंपनीला नव्या मद्य धोरणाचा फायदाही झाला आहे. ‘लोकसत्ता’ने त्यावर प्रकाश टाकला होता. अशा वेळी संबंधित खाते सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविणे कितपत औचित्याचे हा मुद्दा उपस्थित होतो.
घाईघाईने झालेल्या शपथविधीवर टीका
सुनेत्रा पवार यांचा शपथविधीचा निर्णय घाईत झाला आहे. अजित पवार जाऊन चारच दिवस झाले आहेत. यावर काय बोलणार, या निर्णयामागे काही तांत्रिक अडचणी किंवा राजकीय रणनीती असू शकते. – गिरीश महाजन, मंत्री
सुनेत्रा पवार यांना आठ दिवसांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेता आली असती. एवढी घाई करण्याची गरज नव्हती. त्यांना एवढी कसली भीती सतावत होती, की त्यांनी शपथ घेण्याची घाई केली? – संजय शिरसाट, मंत्री
महायुतीतील पक्ष सत्तेसाठी एकत्र आले असून त्यांना विचारांशी देणेघेणे नाही. अजित पवार यांच्या निधनास चार दिवसही झाले नसताना आणि बहुमत असताना शपथविधीसाठीची घाई अनाकलनीय आहे. – हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

