मुलगी झाली हो (Mulgi Zali Ho) मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी राजकीय भूमिका घेतल्यानं मालिकेतून काढल्याचा आरोप केला. यानंतर त्यांच्यावर महिलांशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप झाला. मात्र, यावर आता किरण माने यांच्यासोबत काम केलेल्या अनेक महिला सहकलाकारांनी समोर येत भूमिका मांडली. या प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी किरण मानेंना समर्थन देणाऱ्या महिला कलाकारांचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी किरण माने आणि स्टार प्रवाहचे हेड सतीश राजवाडे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी या मुद्द्यावर सविस्तरपणे भाष्य करत दोन्हीही बाजू समजून घेतल्या. यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी या बैठकीत काय घडलं त्याबद्दल सांगितले.

‘हा निर्णय माणुसकीच्या विरोधातला’, जितेंद्र आव्हाड, किरण माने आणि सतीश राजवाडे यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

“एखाद्या कलाकाराला असं तडकाफडकी कोणताही विचार न करता बाहेर काढणे हा माणुसकीच्या विरोधातील निर्णय आहे. त्या मालिकेतील सर्व प्रमुख स्त्री कलाकारांनी किरण मानेंची बाजू उचलून धरली आहे. त्यामुळे किरण मानेंवर संशय घ्यायला मला तरी कुठेही जागा दिसत नाही. या मालिकेतील सर्व स्त्री कलाकारांनी किरणची बाजू घेतली आहे,” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“एका स्त्रीने आरोप केला आणि बाकीच्या कलाकारांनी त्याची बाजू घेतली आहे. त्यामुळे कुठेही कसलाही रंग न लावता चॅनल, प्रोडक्शन हाऊस या सर्वांनी एकत्र बसावं आणि हा तिडा सोडवावा. यावेळी कोणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका चॅनलने घ्यावी,” असा सल्ला आव्हाडांनी यावेळी दिला.

अभिनेते किरण मानेंवर महिलांशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप, आता अनेक महिला सहकलाकार पुढे सरसावल्या, म्हणाल्या…

“एका प्रोडक्शन हाऊसविरोधात लहान लहान कलाकारांनी जी भूमिका घेतली त्यासाठी फार धैर्य लागते. त्यात त्यांना करिअर करायचं आहे. आपलं करिअर डावावर लावून या स्त्रिया बोलतात तेव्हा तुम्हीच ओळखा सत्य काय असू शकतं. त्या सर्व स्त्री कलाकारांचा सत्कार केला पाहिजे. त्या खऱ्या जिजाऊच्या लेकी आहेत. त्यांनी न घाबरता आपलं करिअर डावावर लावलं, असं होता कामा नये. त्यांनाही आज धमक्या येत आहेत, असेही जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

अभिनेते किरण माने यांच्यावर महिलांसोबत गैरवर्तनाचा आरोप झाल्यानंतर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक महिला सहकलाकारांनी समोर येऊन हे आरोप फेटाळले आहेत. किरण माने यांच्यासोबत काम करताना त्यांनी कधीही गैरवर्तन केलं नसल्याचं म्हटलं आहे. यात अभिनेत्री अनिता दाते-केळकर, अभिनेत्री प्राजक्त केळकर, अभिनेत्री श्वेता आंबीकर, अभिनेत्री शितल गीते, गौरी सोनार यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp minister jitendra awhad praised the female actors who supported actoor kiran mane nrp
First published on: 20-01-2022 at 19:32 IST