scorecardresearch

पुरंदरेंचं पत्र दाखवत ‘पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी’ म्हणणाऱ्या मनसेला राष्ट्रवादीचं उत्तर; म्हणाले, “अक्कल ठिकाणावर ठेवून जरा…”

मनसेने बाबासाहेबांनी १० नोव्हेंबर २००३ रोजी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला लिहिलेलं एक पत्र समोर आणलं आहे.

NCP MNS babasaheb purandare
राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये या विषयावरुन नवीन वाद सुरु झालाय (फाइल फोटो)

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आधी गुढीपाडवा मेळावा आणि नंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधलाय. या टीकेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध मनसे असा खडा सामना पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंना ठाण्यातल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षातील इतर प्रमुख नेत्यांवर तोफ डागल्यानंतर राष्ट्रवादीकडून देखील त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. खुद्द शरद पवारांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेब पुरंदरे, जेम्स लेनचं पुस्तक आणि जातीपातीचं राजकारण यासंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर मनसेकडून २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेलं एक पत्रच जाहीर करत शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. आता या माफीच्या मागणीवर राष्ट्रवादीने उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा >> “ब्लु प्रिंट, विकासाच्या कल्पना मशिदींवरील भोंगे, मदरश्यांवर येऊन थांबतात तेव्हा…, राज ठाकरे म्हणजे…”; MNS नेत्याची राजीनाम्याची पोस्ट

पवारांनी नेमकं काय म्हटलेलं?
जेम्स लेनसंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली. “जेम्स लेननं केलेल्या लिखाणात त्याचा आधार म्हणून बाबासाहेब पुरंदरेंकडून ही माहिती घेतली असं म्हटलं होतं. एखाद्या लेखकानं गलिच्छ प्रकारचं लिखाण केलं आणि त्याला माहिती देण्याचं काम पुरंदरेंनी केलं. त्याचा खुलासा पुरंदरेंनी कधी केला नाही. म्हणून त्यांच्यावर टीका-टिप्पणी केली असेल, तर मला त्याचं दु:ख वाटत नाही तर अभिमान वाटतो. त्यामुळे याबाबत कुणी काय म्हटलं असेल, तर मला त्याबद्दल फारसं बोलायचं नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.

नक्की वाचा >> “शरद पवार राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देतायत म्हणजे…”; मनसे नेत्यानं वक्तव्य केला आनंद

मनसेचा टोला…
मनसेने बाबासाहेबांनी १० नोव्हेंबर २००३ रोजी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला लिहिलेलं एक पत्र समोर आणलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पत्र समोर आणलं असून त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “मला वाटतं हे पत्र स्वयंस्पष्ट आहे. जे काल शरद पवार म्हणाले होते की बाबासाहेब पुरंदरेंनी याबाबत कुठेही काही म्हटलं नाही, त्यावर हे पत्र स्वयंस्पष्ट आहे. त्यांच्या भावना या पत्रात बाबासाहेबांनी व्यक्त केल्या आहेत. या पत्राची कल्पना १०० टक्के राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. तरीही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला गेला. राज ठाकरे भाषणात जे म्हणाले की राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून जातीजातींत भांडणं लावण्याचं काम करण्यात आलं आहे, त्याचा ढळढळीत पुरावा या पत्रापेक्षा दुसरा कुठला असू शकत नाही”, असं देशपांडे म्हणाले.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: …अन् वसंत मोरे राज ठाकरेंच्या पाया पडले; ‘शिवतीर्थ’वरील बैठकीमधील Inside Photos पाहिलेत का?

“त्यांनी (पवारांनी) म्हटलं होतं की माझ्याकडे यासंदर्भात माहिती नाही. आता माहिती समोर आली आहे. हे पत्र त्यांनी बघावं. जर त्यांना वाटलं की चूक झाली आहे, तर महाराष्ट्राची त्यांनी माफी मागितली पाहिजे”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

मनसेला राष्ट्रवादीचं उत्तर
पत्र दाखवत शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागणी असं म्हणणाऱ्या मनसेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलंय. आ. ह. साळुंखे लिखित ‘पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर’ या पुस्ताचं मुखपृष्ठाचा फोटो मिटकरींनी ट्विट केलाय. या फोटोसोबत शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये, “पांडे ‘बुवा’ उशीरा सुचलेल्या शहाणपणाची पत्र सोशल मीडियावर टाकून खोट्या प्रसिद्धीची धडपड मी समजू शकतो,” असा टोला मिटकरींनी देशपांडेंना लगावला आहे. “अक्कल ठिकाणावर ठेवून जरा हेही वाचा,” म्हणत मिटरींनी पुस्तकाचा संदर्भ दिलाय. “अगोदरच तुमचा भोंगा फाटलाय आणि हो या देशात एकच बाबासाहेब आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर. उगाच अकलेचे तारे तोडून आम्हाला बोलायला भाग पाडू नका,” असंही मिटकरी म्हणालेत.

नक्की वाचा >> भोंगा प्रकरणावरील मतभेदांनंतर वसंत मोरेंना ‘शीवतीर्थ’वर पाहताच राज ठाकरेंनी उच्चारले ‘ते’ तीन शब्द; मोरेंनीच केला खुलासा

त्या पत्रातील मजकूर काय?
“ज्यांच्यावर कोट्यवधी भारतीयांचं प्रेम आहे, त्यांच्याबद्दलचे निराधार आरोप आम्ही सहन करणार नाही. जेम्स लेन यांनी त्यांच्या पुस्तकात हेच केलं आहे. हे पुस्तक तुमच्याकडून प्रकाशित होत आहे. शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेवांविषयी जेम्स लेननं जे विधान केलंय, ती त्याच्या घाणेरड्या मनोवृत्तीची उत्पत्ती आहे. त्यामुळे प्रकाशक आणि लेखकांनी २५ नोव्हेंबर २००३ पर्यंत कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी आणि हे पुस्तक भारत आणि परदेशातूनही मागे घ्यावं. जर प्रकाशक आणि लेखकानं असं काही केलं नाही, तर भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती आम्ही करू”, असं या पत्रातून बाबासाहेब पुरंदरे आणि इतर इतिहासकारांनी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला सांगितल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp mla amol mitkari slams sandeep deshpande over babasaheb purandare letter issue scsg

ताज्या बातम्या