अर्थ खात्याची सूत्रे हाती येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षांव केला आहे. त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सर्वच आमदारांना निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, शरद पवार गटाचा किल्ला लढवणारे आणि अजित पवार गटावर टीका करणारे जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघासाठी मात्र निधी मंजूर झालेला नाही. त्यांना अद्यापही निधीची प्रतीक्षा आहे. या निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. याविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचंही आव्हाडांनी सांगितलं आहे. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, "नगरविकासच्या चर्चेवर भाष्य करताना मी सांगितलं की, विकासामध्ये राजकारण करायचं नसतं, असं यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणायचे. गेल्या वर्षभरात आम्ही बघत आहोत. माझ्या एकट्याच्या मतदारसंघात नगरविकास खात्यातर्फे १०० कोटी रुपये देण्यात आले. पण ते पैसे कुणाला दिले, कसे दिले? याच्याशी काही देणंघेणं नाही. पण मला एक रुपयाही देण्यात आला नाही. पण माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी सरकारी पैशांचा वापर केला जात असेल तर ते चुकीचं आहे. हेही वाचा- “…आता अजित पवार शिंदे गटाच्या मानेवर बसलेत”, ठाकरे गटाच्या नेत्याचं थेट विधान "मी माझ्या मतदारसंघात भरपूर काम केलं आहे. परवा नगरविकास खात्याचा भार सांभाळणारे मंत्री उदय सामंत म्हणाले, जितेंद्र आव्हाडांनी मागच्या काळात सर्वाधिक पैसे नेऊन मतदारसंघातील सर्व रस्ते काँक्रीटचे केले आहेत. पण नगरविकास खात्याचे पैसे वापरून मला राजकीयदृष्ट्या त्रास देण्याचा प्रयत्न करणं, चुकीचं आहे. मी हे प्रकरण न्यायालयात नेणार आहे," अशा इशारा आव्हाडांनी दिला. हेही वाचा- ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांवर निधीवर्षांव; अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच अजित पवारांकडून खास तरतूद आव्हाड पुढे म्हणाले, "निधीचं वाटप करताना प्रत्येक मतदारसंघात किती पैसा गेला? याच्यात स्पष्टता आणि समानता असली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या अधिकारांबाबत मला कुठलाही आक्षेप नाही. पण जी कामं झालेली आहेत, ती कामं पुन्हा बिलांमध्ये दिसतात. केवळ ठाणे शहरात पाच कोटी स्क्वेअर फुटांचं अनधिकृत बांधकामाचं काम सुरू आहे. याचा दर ३०० रुपये प्रति स्क्वेअर फूट इतका आहे, याचा हिशेब केला पाहिजे."