दिवाळी आणि इतर सणांना रात्री केवळ आठ ते 10 या वेळेतच फटाके वाजवण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. फटाक्यांवर सरसकट बंदी घालण्यास मात्र न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अभ्यंगस्नानानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही, परिणाम भोगण्याची तयारी असल्याचं सांगत निर्णयाला आव्हान दिलं आहे.

ट्विटरच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मत मांडलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘अभ्यंगस्नानानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही. लक्ष्मी पूजनच्या मुहूर्तावर फटाके वाजवणार. फटाके आणि दिवाळी अतूट नाते. परिणाम भोगण्याची तयारी’.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली. त्यामुळे नागिरकांना नेहमीप्रमाणे फटाक्यांसह दिवाळी आनंदाने साजरी करता येणार आहे. दरम्यान, फटाक्यांची ऑनलाइन विक्री करता येणार नाही, असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे ई-कॉमर्स साइट्सवरुन फटाके विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे. फटाके विक्रीबाबत अंशतः घातलेली बंदी ही देशभरात लागू असून पर्यावरण रक्षणासाठी या आदेशांचे नागरिकांनी पालन करावे असे न्या. ए. के. सिक्री आणि न्या. अशोक भुषण यांनी निर्णय देताना म्हटले आहे.

दिवाळीत आतषबाजी कायम; फटाके विक्रीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

सुप्रीम कोर्टाने देशभरात सरसकट फटाके विक्रीच्या बंदीला नकार दिला असला तरी कमी प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांचीच विक्री केली जावी असे आपल्या आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर फटाक्यांची ऑनलाइन विक्री करण्यावरही कोर्टाने बंदी घातली आहे. त्यामुळे अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना फटाके विक्री करता येणार नाही.

त्याचबरोबर, दिवाळीच्या रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडता येणार आहेत. तर, नाताळ आणि नवीन वर्षाला रात्री ११.४५ ते मध्यरात्री १२.३० पर्यंत अर्थात पाऊण तासच फटाके फोडता येतील, असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. मोठे फटाके आणि फटाक्यांच्या माळांवरही सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. तसेच विशिष्ट सुरक्षित ठिकाणीच आणि ठरवून दिलेल्या वेळेतच फटाके उडवावेत असेही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.