Rohit Pawar On Mahayuti : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महायुती असा मुख्य सामना रंगण्याची चिन्ह आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगानेच जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा उद्धव ठाकरे असतील असा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून अनेकदा करण्यात आला. मात्र, यावरही अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? यावरही गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु असून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पावर यांनी सूचक भाष्य करत महायुतीवर हल्लाबोल केला आहे. तसेच विधानसभेला महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? या प्रश्नावर बोलताना रोहित पवारांनी सूचक विधान केलं. "महायुतीला एकनाथ शिंदे यांचा चेहराच पुढे करावा लागेल", असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : 'राज ठाकरेंची गाडी तुम्ही अडवायला सांगितली?', या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले; "त्यांनी माझं नाव…" रोहित पावर काय म्हणाले? "आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती कोणाचा चेहरा पुढे करेल? याविषयी मला वाटतं की महायुतीला एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे करावा लागेल. कारण देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे केला तरी त्यांना अडचण येऊ शकते. तसेत अजित पवार यांचा चेहराही मुख्यमंत्री पदासाठी पुढे केला तरी अडचण येऊ शकते. एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे वाद नको म्हणून महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहारा एकनाथ शिंदे हेच असू शकतात", असं रोहित पावर यांनी म्हटलं आहे. फडणवीस योजनेचं नावही घेत नाहीत "महायुतीमधील विषय एवढाच आहे की, महायुती सरकारच्या योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं म्हणतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे माझी लाडकी बहीण योजना म्हणतात. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या योजनेचं नावही घेत नाहीत. त्यामुळे हा गोंधळ आधी मिटवावा", अशी खोचक टीका रोहित पवार यांनी महायुतीवर केली आहे. रोहित पवारांचं राज ठाकरेंना आव्हान शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे जातीचं राजकारण करत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “राज ठाकरे यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलावं. दोन समाजामध्ये जातीय द्वेष कोणी निर्माण केला असेल तर तो भाजपाच्या लोकांनी निर्माण केला. भाजपाला फायदा होईल असे विधान जर राज ठाकरे करत असतील तर त्यांनाच विचारायला हवं की तुम्हाला भाजपाबाबत काय वाटतं?”, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला