Rohit Pawar On Raj Thackeray : मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्यावेळी टीका करताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे जातीपातीचं राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांच्या घरासमोरील आंदोलनावर आणि राज ठाकरे यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे. "राज ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलावं", असं आव्हान रोहित पवार यांनी दिलं आहे. रोहित पवार काय म्हणाले? "लोकशाही पद्धतीने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, खरा प्रश्न हा आहे की सत्तेत कोण आहे? सत्तेत असणाऱ्यांकडे २२० पेक्षा जास्त आमदार आहेत. केंद्रात देखील महायुतीची सत्ता आहे. अशा परिस्थितीत सर्व अधिकार हे त्यांच्याकडे आहेत. पण सत्तेत असलेले लोकच निर्णय घेत नसतील तर त्यांना विचारायला हवं. याआधी मराठा आरक्षणाबाबतची एक बैठक महायुतीने लावली होती. त्यामध्येही शरद पवार हे स्वत: आले होते. तसेच चर्चाही झाली होती. पण होतं असं की, मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांना काही नेते भेटतात. तसेच ओबीसी समाजाचे जे आंदोलन करणारे लोक आहेत त्यांना दुसरे नेते भेटतात. मग या दोन्ही समाजाबाबत काय चर्चा झाली, याबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाही", असा आरोप रोहित पवार यांनी केला. हेही वाचा : Supriya Sule : “महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत आपलं सरकार..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत "आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते न्यायालयात जातात, जसं की राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं. पण ते गुणरत्न सदावर्ते यांनी हानून पाडलं. आता ते देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे याबाबत सत्तेतील लोकांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, आमचा पाठिंबा आरक्षणाला आहे", असंही रोहित पवार यांनी म्हटलं. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले, "राज ठाकरे हे दिल्लीचे आदेश ऐकायला लागले आहेत. आता महायुतीकडे एकच पर्याय आहे की मताचं विभाजन झालं पाहिजे. मग त्यासाठी जे कोणते नेते आहेत किंवा पक्ष आहेत त्यांचा वापर हा भाजपाकडून केला जात आहे. राज ठाकरे हे दिल्लीचं ऐकायला लागले आहेत, त्यामुळे अशा नेत्यांना लोक सुपारीबाज म्हणायला लागले आहेत", अशी टीका रोहित पवारांनी केली. राज ठाकरेंना आव्हान शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे जातीचं राजकारण करत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, "राज ठाकरे यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलावं. दोन समाजामध्ये जातीय द्वेष कोणी निर्माण केला असेल तर तो भाजपाच्या लोकांनी निर्माण केला. भाजपाला फायदा होईल असे विधान जर राज ठाकरे करत असतील तर त्यांनाच विचारायला हवं की तुम्हाला भाजपाबाबत काय वाटतं?", असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला.