scorecardresearch

रोहित पवारांकडून अजित पवारांच्या विधानाचं समर्थन; ‘त्या’ वक्तव्यांचा उल्लेख करत भाजपावर टीकास्त्र

अजित पवारांच्या वक्तव्याचं समर्थन करत रोहित पवारांनी भाजपावर टीका केली आहे.

रोहित पवारांकडून अजित पवारांच्या विधानाचं समर्थन; ‘त्या’ वक्तव्यांचा उल्लेख करत भाजपावर टीकास्त्र
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अलीकडेच छत्रपती संभाजी महाराजाबाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. ‘छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, ते धर्मवीर नव्हते,’ अशा आशयाचं विधान अजित पवारांनी केलं. या विधानानंतर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. तसेच अजित पवारांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणीही भाजपाकडून करण्यात आली आहे.

या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचं समर्थन करत भारतीय जनता पार्टीवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपाचे विविध नेते आणि राज्यपाल यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह बोलले, तेव्हा भाजपानं आंदोलन का केलं नाही? असा सवाल रोहित पवारांनी विचारला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “नंगटपणा हा…”, अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील फोटो शेअर करत अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल

अजित पवारांच्या विधानावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक असं संबोधलं. स्वराज्यरक्षक ही पदवी लोकांनी दिली आहे. त्याची व्यापकता खूप मोठी आहे. स्वराज्यरक्षक ही भूमिका किती मोठी आहे, यावर गेल्या दोन-तीन दिवसांत अनेक अभ्यासकांनी वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे यावर भाजपा राजकारण करणारच आणि आंदोलन करण्याचाही ते प्रयत्न करतील.”

हेही वाचा- “शिंदे गट गँगवॉरमध्ये मारला जाईल”; राऊतांच्या विधानावर संजय गायकवाडांची प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या टोळक्याचं…”

“पण जेव्हा भाजपाचे नेते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह बोलले. तेव्हा तुम्ही आंदोलन का केलं नाही? हा प्रश्न लोकांच्या मनात आहे. त्यामुळे जिथे राजकारण दिसतं तिथे भाजपा पुढे येते. जिथे समाजकारण असतं, महापुरुषांचे विचार जपण्याची वेळ येते, तेव्हा आम्ही नागरिक म्हणून पुढे असतो. हाच एक फरक आपल्याला भाजपाच्या आंदोलनातून बघायला मिळतो,” अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 20:57 IST

संबंधित बातम्या