दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहे. या घटनेवर शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही भूमिका मांडली असून, सरकारवर टीका केली आहे. “शांततेच्या मार्गानं विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन काही लोकांना आवडत नाही का? अशी शंका येत आहे. पण, सत्ताधाऱ्यांकडे सत्तेची ताकद असली तरी त्यापेक्षाही अधिक ताकद ही सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे,” असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर काही गुंडांनी हल्ला केला. हा हल्ला अभाविपनं केल्याचा आरोप काही विद्यार्थी संघटनांनी केला. मात्र, त्याचा अभाविपनं इन्कार केला. या हल्ल्यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकही जखमी झाले होते. या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटले. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथेही आंदोलन करण्यात आले. यात आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. त्यानंतर रोहित पवार यांनी फेसबुकवरून आपली भूमिका मांडली.

पवार म्हणाले, “दिल्लीतील जवाहरलाल नेहरु (जेएनयू) विद्यापीठातील विद्यार्थी नेत्यांवर झालेल्या हल्ल्याची घटना ही भयंकर संताप आणणारी आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन त्यांना पाठिंबा दिला. संपूर्ण देशात या हल्ल्याविरोधात विद्यार्थ्यांनी रान पेटवायला सुरवात केली आहे.

वास्तविक ‘जेएनयू’मध्ये शिकणारा विद्यार्थी हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तेथे त्यांना परवडेल अशीच फी आकारण्याची गरज असताना, भरमसाठ फी वाढ केली आहे. याविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मार्ग काही लोकांना आवडत नाही का, अशी शंका या हल्ल्यामुळे येते. विद्यापीठाच्या गेटवर पोलीस बंदोबस्त असताना एकदम चाळीस हल्लेखोर कसे आत शिरतात आणि पोलीस त्यांना अटकाव का करु शकत नाहीत. तसेच हल्ला होताना पोलीस नामानिराळे कसे राहु शकतात, हे सगळंच संशयास्पद आहे.

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही विद्यापीठात कुलगुरुंची उपस्थिती आवश्यक असते. परंतु गेल्या दीड-दोन महिन्यांपासून या विद्यापीठात कुलगुरु फिरकलेही नाहीत. त्यामुळे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणारा हल्ला हा लोकशाही आणि घटनेला मानणाऱ्यांवरचाच हल्ला म्हणावा लागेल. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि अशी घटना अन्य कोठेही घडू नये यासाठी माझ्यासारखे लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभे राहू, असा विश्वास देतो. दिल्लीमधील विधानसभेच्या निवडणुकांची पार्श्वभूमी या हल्ल्याला आहे का, अशीही एक शंका आहे. पण सत्ताधाऱ्यांकडे सत्तेची ताकद असली तरी त्यापेक्षाही अधिक ताकद ही सर्वसामान्य जनतेमध्ये आहे, हे सर्वांनीच लक्षात ठेवण्याची गरज आहे,” असा सूचक इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.