अहिल्यानगर: महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र याच भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज, सोमवारी अहिल्यानगरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. भाजप प्रदेशाध्यक्षांची रॅली आणि शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादीच्या आमदारांचे, असे चित्र आज शहरात पहावयास मिळाले.

भाजप- राष्ट्रवादी (अजित पवार गट)-शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीमध्ये राज्यात सत्ता असली तरी महापालिका निवडणूक निमित्ताने अनेक ठिकाणी बिघाडी झालेली आहे. पुण्यात भाजप व राष्ट्रवादी एकमेकांविरुद्ध लढत आहेत तर अहिल्यानगरमध्ये भाजप व राष्ट्रवादी यांची युती शिवसेनेच्या विरोधात मैदानात आहे. महापालिका निवडणूक प्रचारातून अजित पवार व रवींद्र चव्हाण यांनी एकमेकांच्या पक्षांवर टीका केली होती. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी यांची नगरमध्ये युती असताना होणाऱ्या रॅलीकडे विशेष लक्ष होते. या युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात फोडण्यात आला. नंतर त्यांची शहरातील प्रमुख रस्त्यावरून रॅली व नंतर दिल्ली दरवाजा येथे जाहीर सभा झाली.

रॅली व जाहीर सभेसाठी शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्यात प्रमुख वाटा उचलला तो आमदार संग्राम जगताप यांनी. रॅली व सभेमध्येही भाजप समर्थकांची संख्या नगण्यच होती. आमदार जगताप यांचे फलक झळकवण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा एक फलक वगळता इतर सर्व फलक होते ते केवळ राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे. रॅलीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्याच नावाच्या घोषणा दिल्या. पालकमंत्री विखे भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार जगताप, भाजपचे संघटन मंत्री विजय चौधरी‌ आदी उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवारांची व समर्थकांची संख्या अधिक होती. रॅलीच्या मार्गावर राष्ट्रवादीचे झेंडे अधिक संख्येने फडकत होते. एकूणच रॅलीवर राष्ट्रवादीचे अर्थात आमदार जगताप यांचे वर्चस्व जाणवत होते.

पालकमंत्री विखे यांनीही दिल्ली दरवाजा येथील सभेत बोलताना आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवली जात असल्याची जाहीर केले. नगर शहर भयमुक्त करण्यासाठी शहरातील व्यापार रोजगार विस्तार करण्यासाठी शहर सुंदर व सुरक्षित बनवण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी युतीचा महापौर हवा असल्याचे त्यांनी सांगितले.

भाषण एक मिनिटाचे, प्रतीक्षा अर्ध्या तासाची

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी इतर ठिकाणी प्रचाराला जाण्याची घाई असल्याचे सांगत सभेत अवघ्या एक मिनिटाचे भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचा महापौर होईल असा दावा करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. ते तातडीने पोलीस मुख्यालयाच्या मैदानात थांबलेल्या हेलिकॉप्टरकडे निघून गेले. मात्र तेथे गेल्यावर त्यांना तब्बल अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. प्रदेशाध्यक्षांची रॅली व सभा होईपर्यंत हेलिकॉप्टरचा पायलट जेवणासाठी सावेडी उपनगरातील एका हॉटेलमध्ये गेला होता. हा पायलट कोरियन आहे, त्याला कोरियन पद्धतीचे जेवण हवे असल्याने त्या हॉटेलमध्ये नेण्यात आले. परतताना जिल्हा सरकारी रुग्णालयाजवळ वाहतूक कोंडीत या पायलटची गाडी अडकली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना अर्धा तास हेलीपॅडवर थांबावे लागले. चव्हाण यांनी भाषण एक मिनिटात आटोपले, मात्र अर्धा तास त्यांना प्रतीक्षेत घालवावे लागले.