scorecardresearch

भगतसिंह कोश्यारींना पदमूक्त केल्यानंतर अमोल मिटकरीचं ट्विट चर्चेत; म्हणाले, “इज्जत वाचविण्याचा प्रयत्न”

अमोल मिटकरी यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेला होता. आता जाता जाता त्यांनी पुन्हा खोचक ट्विट केले आहे.

Amol Mitkari on Bhagatsinh Koshyari
भगतसिंह कोश्यारी यांचे विरोधक राहिलेल्या अमोल मिटकरी यांनी पुन्हा खोचक ट्विट केले.

“निर्लज्जम सदा सुखी, अशा पद्धतीने भाजपाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रात उतरले होते. मविआने त्यांच्याविरोधात आंदोलन केल्यानंतर सरकारला सुचलेले हे उशीराचे शहाणपण आहे. कारण आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणादरम्यान गदारोळ होणार होता, तसेच कोल्हापूरमधील दीक्षांत सोहळ्याला राज्यपालांना येऊ दिले जाणार नव्हते. कोल्हापूरवासीयांनी त्याविरोधात आंदोलन देखील केले. म्हणूनच महापुरुषांचा अपमान करणाऱ्या एका बेशरम माणसाला पदमूक्त केल्याबद्दल आम्हाला आनंद वाटत आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

रमेश बैस यांच्यारुपाने झारखंडचे राज्यपाल आता महाराष्ट्राला मिळत आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की, त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखे भाजपाचे कार्यकर्ते म्हणून काम करु नये. महापुरुषांचा त्यांनी आदर करावा. भगतसिंह कोश्यारी नावाची घाण राज्यातून गेली, याचा आनंद वाटतो. इतके होऊनही भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी का नाही मागितली? असा प्रश्न देखील मिटकरी यांनी उपस्थित केला.

हे वाचा >> अग्रलेख : राजभवनातील राधाक्का!

उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली

“अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या सन्मानपूर्वक रवानगी नंतर (कुठलाही पश्चाताप व्यक्त न करता) महाराष्ट्राला रमेश बैस यांच्या रूपाने नवीन राज्यपाल मिळाले आहेत .अपेक्षा करतो भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून राज्यपाल राज्यपालांसारखेच वागतील. भाजपचे कार्यकर्ते राहणार नाहीत.”, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केली आहेत.

“राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला आहे. राज्यपालांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत खुलासा करतील का?” असा खोचक सवाल अमोर मिटकरी यांनी याआधी उपस्थित करत त्यांच्यावर निशाणा साधला होता.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी जी शिवप्रतिमा योगी आदित्यनाथ यांना देण्यात आली त्यावरून अमोल मिटकरींनी टीका केली होती. पायात पायताण घालून जर “शिवप्रतीमा” देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमतीदर्शवित असतील तर या प्रकाराला काय म्हणावे? महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही असं राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 13:22 IST