scorecardresearch

“राष्ट्रवादीचा मोगल प्रेमी चेहरा…”, शिवजयंती सोहळ्यावरील बहिष्कारानंतर भाजपाची अमोल कोल्हेंवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवनेरी किल्ल्यावर आयोजित केलेल्या शासकीय शिवजयंती सोहळ्याचा आपण बहिष्कार करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

Amol Kolhe Keshav Upadhye
शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजाचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शासकीय शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आपण बहिष्कार करत असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. दरम्यान, अमोल कोल्हे यांच्यावर आता भाजपाकडून टीका सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, “केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी यांना छत्रपती शिवाजी महाराज हवेत का? हा तर राष्ट्रवादीचा मोगल प्रेमी चेहराच पुन्हा एकदा समोर आला आहे.”

केशव उपाध्ये यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटलं आहेकी, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय शिवजयंती सोहळ्यावर बहिष्कार करत असल्याची घोषणा केली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा हिंदूविरोधी आणि मोगलप्रेमी चेहरा लोकांसमोर आला आहे.

राष्ट्रवादीचा मोगल प्रेमी चेहरा समोर : उपाध्ये

उपाध्ये म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस देशातल्या तमाम जनतेसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. पण या क्षणावर बहिष्काराची भाषा ते करत आहेत. याचाच अर्थ राष्ट्रवादीचा मोगलाई प्रेमी चेहरा समोर येत आहे, हा मोगलाई चेहरा वारंवार दिसत असतो, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागणीतून समोर येत असतो. तोच चेहरा अमोल कोल्हे पुढे आणत आहेत.

भाजपा प्रवक्ते म्हणाले की, तुमच्या मागण्यांबद्दल मतभेद असू शकतात. तुमची एखादी मागणी असू शकते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाविषयी बहिष्काराची भाषा ही १०० टक्के मोगलप्रेमीचीच असू शकते.

हे ही वाचा >> “म्हणून मला तुरुंगात टाकू शकले नाहीत”; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, “मी ५ वर्ष…”

कोल्हे यांच्या बहिष्कारामागचं कारण काय?

शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवला जावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हे स्वतः जुन्नरचे रहिवाशी आहेत. त्यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवनेरी किल्ला येतो. गडावर कायमस्वरुपी भगवा ध्वज फडकवला जावा यासाठी कोल्हे यांनी लोकसभेत मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीला कोणीच दाद दिली नाही. या मागणीकडे सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हे यांनी शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-02-2023 at 12:44 IST

संबंधित बातम्या