राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाप्रमाणेच पंतप्रधानपदाची देखील मोठी चर्चा राजकीय वर्तुळात वेळोवेळी होताना दिसते. त्याचवेळी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजि पवार यांच्या देखील मुख्यमंत्रीपदाची चर्चा सत्तास्थापनेवेळी पाहायला मिळाली. मात्र, यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना थेट कार्यकर्त्यांना आवाहनच केलं आहे. एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला शरद पवारांना पंतप्रधान आणि अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचं असल्याचं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना अमोर कोल्हे यांनी आपल्या मनातली इच्छा यावेळी बोलून दाखवली. त्याचवेळी, त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या इच्छेसाठी ताकद उभी करण्याचं देखील आवाहन केलं आहे.

“ऋणातून उतराई व्हायची वेळ”

शिरूरमधल्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आज अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यासंदर्भात बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “अजित दादांच्या हस्ते उद्घाटन होत असताना मी दोन पावलं बाजूला उभं राहून दादांना न्याहाळत होतो. दादांनी पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीत अनेकांना अनेक गोष्टी दिल्यात. पण ऋणातून उतराई होण्याची एक वेळ असते. मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचंय, ही भावना जर असेल, तर ही ताकद प्रत्येक कार्यकर्त्यानं दादांच्या पाठिशी उभी करणं आपलं कर्तव्य आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

सर्वोच्च नेत्याला एका शहराच्या पालिकेत…

“एक कार्यकर्ता म्हणून माझी ही भावना आहे की शरद पवार पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष घालतायत, अजितदादा लक्ष घालतायत ही भाग्याची गोष्ट आहे. पण एक कार्यकर्ता म्हणून मला माझ्या नेत्याला देशाच्या पंतप्रधानपदी बसलेलं पाहायचं असेल, तर माझ्या सर्वोच्च नेत्यानं एका शहराच्या महापालिकेमध्ये लक्ष घालायला लागू नये अशी कार्यकर्त्यांनी फळी आपण त्यांना दाखवून दिली पाहिजे”, असं देखील अमोल कोल्हेंनी यावेळी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp amol kolhe on ajit pawar as chief minister of maharashtra pmw
First published on: 02-10-2021 at 13:29 IST