Bajrang Sonwane On Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र, या विमान दुर्घटनेबाबत आता अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. सध्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत आता राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी एक वेगळीच शंका व्यक्त केली आहे. ‘अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?’, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी विचारला आहे. ‘अजित पवार यांचं विमान जमिनीला टच होण्याआधीच विमानाचा ब्लास्ट झाला’, असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलं आहे.
बजरंग सोनवणे काय म्हणाले?
“सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतंय तुम्ही पाहा. काय दिसतंय? विमान खाली जमीनीला टच होऊन मग क्रॅश झालं नाही. मला जेवढं कळतंय, विमान खाली येताना तिरकं झालं, पण जमीनीला टच होण्याआधीच विमानाचा ब्लास्ट झाला. कारण त्या ब्लास्टमध्ये देखील विमानाचा पुढचा जो भाग आहे तेथील लोक बाहेर फेकले गेले आणि त्यानंतर विमान जमीनीला टच होऊन स्फोट झाला, म्हणजे ही घटना काय असू शकते? याबाबत संशय नाही का? का त्यात बॉम्ब होता? का विमानाच्या इंजिनाचा ब्लास्ट झाला?”, अशी शंका उपस्थित करत बजरंग सोनवणे यांनी वेगवेगळे सवाल उपस्थित केले आहेत.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला?
‘लिअरजेट ४५’ या विमानाने अजित पवार यांच्यासह पाच जणांना घेऊन सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतून उड्डाण केलं होतं. या विमानाचे मुख्य वैमानिक सुमित कपूर हे अतिशय अनुभवी होते. त्यांच्या नावावर १६,००० तासांहून अधिक काळ विमान उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव होता. सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी हे विमान बारामतीतील धावपट्टीच्या अगदी जवळ पोहोचलं होतं. त्यावेळी दाट धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी असल्याने वैमानिकाने लँडिंगचा पहिला प्रयत्न सोडून दिला होता. एटीसीबरोबर संपर्क साधल्यानंतर वैमानिकाने पुन्हा लँडिगचा प्रयत्न केला. त्यावेळी विमानावरील त्यांचं नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.
विमान कोणते होते?
अजित पवार यांच्यासह पाचजण हे लिअरजेट ४५ या विमानातून प्रवास करीत होते. या विमानाला प्रामुख्याने दोन इंजिने आहेत. साधारणत: व्हीआयपी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील उचभ्रू व्यक्ती या विमानाचा वापर करतात. छोटेखानी असलेले हे विमान वेगाने प्रवास करण्यासाठी वापरले जाते. कमी वेळातच जास्तीत जास्त अंतर कापत असल्याने या विमान प्रवासाला विशेष पसंती दिली जाते. लिअरजेट-४५ विमानाने ३००० किमीपर्यंत प्रवास करता येऊ शकतो. ताशी ८०० ते ८५० किमी वेगाने हे विमान धावते. या विमानाची आसनक्षमता सहा ते आठ प्रवाशांची आहे. त्याची लांबी व उंची अनुक्रमे ५८ ते १४ फूट इतकी असते. लिअरजेट-४५ विमानाला छोट्या धावपट्ट्यांवर तसेच छोट्या विमानतळांवर लँडिंग करणे इतर मोठ्या विमानांच्या तुलनेत सोपे जाते. १९९० च्या सुमारास हे विमान विकसित करण्यात आले होते आणि १९९८ मध्ये त्याची सेवा सुरू करण्यात आली होती.

