२०२४च्या लोकसभा निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या असताना राज्यातल्या आघाड्यांमध्ये जागावाटप कसं होणार? याचबरोबर कोणत्या जागेवरून कोण निवडणूक लढवणार? यावरही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप निश्चित झालेलं नसताना शिरूर लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार? यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. अमोल कोल्हे आणि विलास लांडे या राष्ट्रवादीतल्या दोन नेत्यांकडून दावे केले जात आहेत. एकीकडे विलास लांडे या तिकिटासाठी इच्छुक असताना दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी मात्र वेगळेच सूतोवाच केले आहेत!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमोल कोल्हे हे सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, यंदा विलास लांडे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा पाहायला मिळाली होती. याचदरम्यान अमोल कोल्हे भाजपाशी हातमिळवणी करणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत अमोल कोल्हे, विलास लांडे यांच्या उपस्थितीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील कामगिरीची चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हेंनी सूचक प्रतिक्रिया दिली.

“शरद पवारांसमोर सर्व आढावा मांडला”

“शरद पवारांनी आज शिरूर मतदारसंघातल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. २०१९ साली मी इथली निवडणूक ३ मुद्द्यांवर लढवली होती. बैलगाडा शर्यती, पुणे-नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडी आणि पुणे-नाशिक रेल्वे या तीन मुद्द्यांचा समावेश आहे. चार वर्षांत बैलगाडा शर्यत आणि पुणे नाशिक महामार्गावरची कोंडी हे दोन प्रश्न सुटले आहेत. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प भूसंपादन आणि कॅबिनेटच्या मंजुरीपर्यंत पोहोचला आहे. हा आढावा शरद पवारांसमोर मांडला”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

“…नाहीतर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढतो”, अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुनावलं!

“अंतिम निर्णय शरद पवारांचा, तो मान्य असेल”

“जनसंपर्काच्या बाबतीतलं कार्यकर्त्यांचं महत्त्व त्यांनी समजून घेतलं. त्यानुसार पुढील काळात काम करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत. अंतिम निर्णय पक्ष ठरवेल. शरद पवार जे सांगतील ते धोरण, ते बांधतील ते तोरण. त्यामुळे इतर कुणीही अकारण चर्चा करू नयेत. कलाक्षेत्रात मी काम करत असतो. यात राजकीय भूमिका सोडून सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. त्यामुळे त्यातून अकारण कुठलेही अर्थ काढू नयेत, अशी माझी विनंती आहे”, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

“मी पुन्हा येईन म्हणायला आजकाल मला भीती वाटते. तयारी तशीही सुरूच आहे. माणूस महत्त्वाचा नाही, पक्ष महत्त्वाचा आहे. अंतिमत: पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, तो मला मान्य असेल”, असंही खासदार अमोल कोल्हेंनी यावेळी नमूद केलं.

जनसंपर्क कमी पडतोय का?

“कलाक्षेत्रात सक्रीय असताना राजकीय क्षेत्रात सक्रीय असणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला मी पहिलाच आहे. त्यामुळे अपेक्षाही जास्त असणार. उपलब्ध असणारा वेळ तितकाच कमी आहे”, असं सांगतानाच अमोल कोल्हेंनी विलास लांडेंच्या जनसंपर्काचं कौतुक केलं. “माझ्या माहितीनुसार सर्वोत्तम जनसंपर्क काय असू शकतो, हे त्यांनी दाखवलंय. मला ते शिकण्याची इच्छा आहे. मतदारसंघात अनेक लोकांची खडान् खडा माहिती त्यांच्याकडे असते”, असं ते म्हणाले.

“फडणवीसांचं मक्का-मदिना दिल्लीत आहे, पण तुमचं…”, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!

शिरूरमधील ‘त्या’ बॅनर्समुळे संभ्रम!

शिरूर लोकसभा मतदारसंघात विलास लांडे यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख करणारे बॅनर्स झळकले होते. या बॅनर्सवरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. अमोल कोल्हेंचा जनसंपर्क कमी पडत असल्याचीही चर्चा रंगली होती. यासंदर्भात अखेर आज शरद पवारांच्या उपस्थितीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा झाली. ही उमेदवारी आता अमोल कोल्हेंनाच मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp shirur loksabha constituency amol kolhe on vilas lande pmw
First published on: 05-06-2023 at 13:27 IST