Sunil Tatkare On Rupali Chakankar : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाची सध्या राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या भोंदू अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलं आहे. या अशोक खरातचे अनेक राजकीय हितसंबंधही समोर आले आहेत. मात्र, याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र, या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी अगदी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. ‘मला जेव्हा त्या विषयावर बोलायचं तेव्हा मी बोलेन’, असं म्हणत सुनील तटकरे यांनी अधिक बोलणं टाळलं.

सुनील तटकरे काय म्हणाले?

तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी सुनील तटकरे यांना विचारला. यावर बोलताना सुनील तटकरे यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. सुनील तटकरे म्हणाले की, “मी योग्यवेळी त्यावर बोलेन. मला बोलण्याचा घटनेने अधिकार दिला आहे. त्यामुळे मला ज्यावेळी जेवढं बोलायचं तेवढंच मी बोलेन. तसेच मला जेव्हा त्या विषयावर बोलायचं तेव्हा नक्कीच बोलेन”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

अशोक खरात प्रकरणावर प्रफुल पटेल काय म्हणाले?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात यांच्याबरोबर अनेक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्या अशोक खरातच्या पाया पडताना, पाद्यपूजन करताना, छत्री धरताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका होत असून त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, “अशोक खरात प्रकरणी निश्चित कारवाई केली जाणार आहे. या तपासणीतून आणि चौकशीतून ज्यांची नावे समोर येतील त्यांच्यावर तातडीने आणि सक्तीने कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचीही नावे जोडली गेली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून योग्य ती कारवाई करू. येणाऱ्या एक-दोन दिवसांत हे करू.”