Sunil Tatkare On Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करताना सुनील तटकरे हे फिरता रंगमंच आहेत. अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम या फिरत्या रंगमंचाने केलं अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. त्यांच्या या टिकेनंतर आता खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "२०१९ साली महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी कोणी केली? त्या गद्दारीचे सरदार कोण होते? त्या गद्दारीचे शिलेदार कोण होते? हे देखील सर्वांना माहिती आहे", असा हल्लाबोल सुनील तटकरे यांनी यांनी केला. सुनील तटकरे काय म्हणाले? "आता फिरता रंगमंच असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पण फिरता रंगमंच म्हणजे काय याचा अर्थ त्यांनीच सांगावा. सध्या संजय राऊतांची लेखनी खालच्या पातळीवर गेली आहे. २०१९ साली महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी कोणी केली? त्या गद्दारीचे शिलेदार कोण होते? हे सर्वांना माहिती आहे. कारण २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनी कोणत्या पक्षाला कौल दिला होता? २०१९ च्या विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना अशी युती म्हणून लढवली गेली होती. मग महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात करणारा गद्दार कोण? त्या गद्दारीचे नायक कोण? हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर टीका टिप्पणी करण्याचं काम करु नये", असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : Eknath Shinde : “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना चिमटा; म्हणाले, “त्यांना स्वतःवर…” "२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर कोण कोणाला छुप्या पद्धतीनं भेटत होतं. आता त्यावेळी वेश बदलून जायचे की जॅकेट घालून जात होते, हे त्यांनाच माहिती", असा टोलाही सुनील तटकरे यांनी संजय राऊत यांना लगावला. तटकरे पुढे म्हणाले, "अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार काहीही बोलले नाहीत. मात्र, एक नरेटीव्ह तयार करण्याच काम केलं जात आहे. अजित पवार यांना बदनाम करण्याचं काम विरोधक करत आहेत", असा आरोप तटकरे यांनी केला. मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यावर तटकरे काय म्हणाले? "आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर जो हल्ला झाला तो निदंनीय आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आता राज ठाकरे देखील अनेकांची मिमिक्री करतात. ते देखील प्रत्येकावर टीका करतात. पण राजकीय प्रत्युत्तर दिल्यानंतर अशा पद्धतीने भ्याड हल्ला करणं चुकीचं आहे. सध्या सुरु असलेली टीक्का टिप्पणी महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. राजकारणातील सभ्यता बाळगली जावी. राजकीय उत्तर दिल्यानंतर असा भ्याड हल्ला करणं चुकीचं", असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.