Supriya Sule On Ajit Pawar : राज्यात विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु असून या दौऱ्यात मेळावे, सभा आणि मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. अशातच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत मोठं विधान केलं होतं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक केली. आता मला वाटतं की हा निर्णय चुकीचा होता, असं अजित पवार यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह काय? सगळंच देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरु असून या यात्रेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं आहे. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? "राज्यात सर्व सरकार सत्तेत आल्यानंतर चांगलं काम करतात. पण या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे, या योजनेचा टायमिंग पाहा. त्यांना कधीही बहीण लाडकी वाटली नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना बहीण लाडकी वाटायला लागली. त्यांना नाते आणि व्यवहार यातील फरक कळत नाही. व्यवहारात पैसे असतात. नात्यात प्रेम आणि विश्वास असतो. नात्यामध्ये पैसे घेत नाहीत आणि व्यवहारात प्रेम आणि नातं येत नाही. महाराष्ट्रातील महिला फार स्वाभिमानी आहेत. तुम्ही १५०० रुपये देत आहात तर तुमचे आभारी आहोत. पण जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला १५०० रुपये देऊन आम्ही नात्यात वाहवत जाऊ, तर हा गैरसमज आहे", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. हेही वाचा : हेही वाचा : जे बारामतीत झाले, तेच कर्जत-जामखेडमध्ये’; अजित पवारांवर भाजपाचा दबाव असल्याचा रोहित पवारांचा दावा बहिणींचे पैसे परत घेऊन दाखवा "लाडकी बहीण योजनेबाबत सत्तेतील दोन आमदार बोलले आहेत. त्यातील एकजण म्हणाले, "माझं योजनेवर बारीक लक्ष आहे. दीड हजार रुपयांचे दुप्पट मी करु शकतो. पण निवडणुकीनंतर माझ्या लक्षात आलं की हा पैसा विरोधातील मतदारांना गेला तर मी तुमचाच भाऊ आहे, मी ते पैसे जसे दिले तसे ते परत घेऊ शकतो. माझी त्या आमदाराला विनंती आहे, तुम्ही ते पैसे परत घेऊन तर दाखवाच. फक्त एका बहिणीचे पैसे परत घेऊन दाखवा. मी महायुती सरकारलाही आव्हान देते, तुम्ही योजनेचे पैसे फक्त एखाद्या महिलेकडून परत घेऊन दाखवा. मग पुढे काय करायचं ते पाहू", असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. "विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये लिस्ट चेक केल्या जाणार आहेत. मला देखील माहिती नव्हतं. हे सरकार बूथ आणि मतदानाची यादी चेक करणार आहेत, असं त्यांचेच एक आमदार म्हणाले. मतदान त्यांना असेल तरच पैसे अन्यथा पैसे नाहीत. आता त्यांना हा गैरसमज झाला आहे की, त्यांचं सरकार सत्तेत येईल. त्यांनी या गैरसमजामधून बाहेर पडलं पाहिजे. हे सरकार असं करत असेल तर राज्यातील एकही महिला महायुतीला मतदान करणार नाही", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. पक्ष आणि चिन्ह काय? सगळं देऊन टाकलं असतं "राज्यात अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता. तेव्हा सरसकट कर्जमाफी झाली होती. पण त्यावेळी कोणीतरी असं म्हटलं नाही की आम्ही सातबारा कोरा केला, आम्हाला मतदान झालं नाही तर पुन्हा आम्ही तुमच्या सातबाऱ्यावर कर्ज टाकू. आताचं जे सरकार आहे ते तुमच्या आणि माझ्या सुख आणि दुःखाचं नाही. हे भाऊ आणि बहिणीच्या नात्याला १५०० रुपयांची किंमत लावत आहात. बहिणींचं प्रेम कधीतरी बघा. ही बहीण फक्त १५०० रुपयांसाठी भावांवर प्रेम करत नाही, तर मनापासून प्रेम करते. भावाने मागितलं असतं तर सर्व देऊन टाकलं असतं. पक्ष आणि चिन्ह काय? सगळं देऊन टाकलं असतं", असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं.